मुंबई :
ईशान्य मुंबईत सर्व सुविधांनी सुसज्ज असे एकही रुग्णालय नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी सायन किंवा केईएम रुग्णालयात जावे लागते. अशा स्थितीत गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर जीव गमविण्याची वेळ येते. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मनपा आयुक्त तसेच उपायुक्त संतोषकुमार धोंडे (परिमंडळ ६) यांची भेट घेऊन रुग्णालयाच्या असुविधेबाबत नाराजी व्यक्त करीत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या.
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात ट्रॉमा सेंटर नसल्याची तक्रार नागरिकांनी उपायुक्त धोंडे यांच्याकडे केली होती. त्याच प्रमाणे सिटी स्कॅन, एक्स रे, अँन्जोग्राफी, अँन्जोप्लास्टी या ठिकाणी केली जात नाही. त्यासाठी रुग्णांना बाहेर पाठविले जाते. हृदयासंबंधी येणाऱ्या रुग्णांना सायन किंवा केईएम रुग्णालयात पाठविले जाते. राजावाडी रुग्णालयात न्युरोसर्जनची नेमणूक करण्याची गरज असून सायन रुग्णालयाप्रमाणे राजावाडीमध्येही डॉक्टरांचे युनिट करण्याची मागणी केली जात आहे. राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने या ठिकाणी येणाऱ्या गरोदर महिलांना तब्बल तीन ते चार तास रांगा लावूनही उपचार मिळत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. अनेकदा रुग्णालयातील उद्वाहक बंद असते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. अशीच स्थिती मुक्ताबाई रुग्णालयाची असून या ठिकाणी रुग्णांना बेडशीट मिळत नाही. जेवणासाठी त्यांना ताट, वाट्या घरातून आणायला सांगतात. एकच सिरींज अनेक रुग्णांना वापरली जाते. एकाच स्टँडवर दोन गुल्कोज लावले जातात. रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी टेबल मिळत नाहीत. रुग्णाच्या नातेवाईकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा केली जाते. अशा अनेक तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी मनपा आयुक्त भुषण गगराणी तसेच उपायुक्त संतोषकुमार धोंडे (परिमंडळ ६) यांची भेट घेऊन याबाबत तात्काळ कार्यवाही करीत रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या.