मुंबई :
पर्यावरणीय प्रदूषकांव्यतिरिक्त, घरातील हवेची गुणवत्ता, चयापचय समस्या आणि कामाच्या ठिकाणी असलेले रासायनिक घटक यामुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. ३० ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये धूम्रपानाचा इतिहास नसतानाही त्यांना सतत खोकला येणे आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होणे यासारखी लक्षणे आढळून येत आहेत. यातून फुफ्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपान करणाऱ्यांमध्येच नाही तर धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढत आहे. यासाठी बाहेरील प्रदूषणाबरोबरच घरातील वाढते प्रदूषणही कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२०२५ पर्यंत भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सात पटींनी वाढ होण्याची शक्यता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) च्या संशोधकांनी वर्तविली आहे. पूर्वी वयोवृध्दांमध्ये आढळणारा फुफ्फुसाचा कर्करोग आता तरुणांमध्ये दिसत आहे. २० वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये धूम्रपानाचा इतिहास होता. मात्र मागील १० ते १२ वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होत आहे. पूर्वी फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या १० पैकी ८ जण धूम्रपान करणारे आणि दोन धूम्रपान न करणारे होते. आता, फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या १० पैकी ५ जण धूम्रपान करणारे आणि ५ धूम्रपान न करणारे आहेत. यातून वाढत्या प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाची वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील महिला चुलीवर काम करत असल्याने त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका होता. मात्र घराघरामध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याने प्रदूषणात घट होऊन महिलांमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. समीर गर्दे यांनी सांगितले.
४० ते ५० वयोगटातील धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये घरांमध्ये धूर, वायू प्रदूषण यांचा समावेश असतो. पूर्वी, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या १० रुग्णांपैकी ९ धूम्रपान करणारे आणि १ धूम्रपान न करणारे होते. मात्र आता हे प्रमाण बदलले आहे. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती यांच्या ज्वलनाने घरातील प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यांचा वापर टाळून घरातील प्रदूषण कमी करता येऊ शकते, अशी माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ. तिरथराम कौशिक यांनी दिली.
घरातील प्रदूषणास कारणीभूत घटक
मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकामांमुळे वायू प्रदूषण वाढत आहे. मात्र घरामध्ये सुगंधित मेणबत्त्या, कापूर उत्पादने, अगरबत्ती, मच्छर घालवण्यासाठी जाळण्यात येणाऱ्या अगरबत्ती यांच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे श्वसनाचे विविध आजार उद्भवतात.
खोकला असल्याचे काळजी घ्या
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. हा खोकला क्षयरोग, दमा किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो. क्ष किरण तपासणीमध्ये काही विकृती आढळल्यास, अचूक निदानासाठी सीटी स्कॅन किंवा बायोप्सी करता येते.