शहर

एसटीचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांना कर्मचारी, प्रवाशांच्या समस्येऐवजी ‘शिवनेरी सुंदरी’ची भुरळ

मुंबई :

एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरीपेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून ‘शिवनेरी सुंदरी’ची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समंस्स्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी ‘शिवनेरी सुंदरी’ची नेमणूक करण्याची घोषणा केली. ती परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते केल्यास उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील.

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये केली.

शिवनेरी बाबतीत बोलायचे झाल्यास ही सेवा महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा असून साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेलवरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे ८० टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे या पुरती मर्यादित ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे. आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

‘शिवनेरी सुंदरी’पेक्षा कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देतील

एसटी कर्मचारी व अधिकारी हे अत्यंत चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व ‘शिवनेरी सुंदरी’वर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल. ते ब्रँड ॲम्बेसेडर व ‘शिवनेरी सुंदरी’पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.

या योजनेचा फेरविचार करावा

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्यामुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते. एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे, मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबतात. त्यामुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *