मुंबई :
राज्यामध्ये ठाण्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना हिंगोली, बुलढाणा आणि भंडारा या आठ जिल्ह्यांमध्ये १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या महाविद्यालयातील जागा २०२४-२५ या शैक्षिणक वर्षामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा सुरू असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये ८०० जागा वाढणार आहेत. या निर्णयामुळे नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली भागामध्ये पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार यंदा १० महाविद्यालयांच्या मंजूरीसाठी राज्य सरकारने अर्ज केला होता. मात्र मुंबई व नाशिक येथील दोन महाविद्यालयांनाच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून परवानगी दिली. मात्र अन्य वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता, प्राध्यापकांची कमतरता, बाह्यरुग्ण विभागातील सुविधा, वसतिगृहांची अपुरी संख्या, महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत नसणे अशा विविध कारणांसाठी परवानगी नाकारली होती. या निर्णयाविरोधात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट रोजी आयोगाकडे पहिले अपील केले होते. मात्र त्यावर आयोगाने प्रतिक्रिया न दिल्याने महाविद्यालयांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा अपील केले. यावेळी एमपीएससीच्या माध्यमातून प्राध्यापक व शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, कंत्राटी नियुक्त्या, बदल्या आणि पदोन्नती करण्यात येत आहे. तसेच महाविद्यालयाची इमारत, आवश्यक पायाभूत सुविधा, मुला-मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध करून दिली असल्याचे आयोगाला सांगितले. भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाईल आणि शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरू होण्यापूर्वी आयोगाच्या निकषानुसार प्राध्यापक उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारने २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रतीज्ञापत्र देखील सादर केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय सुरू असून, येथील बाह्यरुग्ण विभागांमध्ये दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण येत असून, रुग्णालयातील खाटाही अधिकाधिक रुग्णांनी व्यापल्या जात आहेत, असे सांगत आठही महाविद्यालयांच्या प्रशासनांनी आयोगाच्या किमान मानकांची पूर्तता करण्याबाबतची कागदपत्रे सादर केली. यावर निवड समितीने यापुढे कधीही महाविद्यालयांची तपासणी केली जाईल, त्यावेळी पायाभूत सुविधांची कमतरता आढळल्यास महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल. असे सांगत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ठाण्यातील अंबरनाथसह अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना हिंगोली, बुलढाणा आणि भंडारा या आठ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी फेरी सुरू असून, तिसऱ्या फेरीमध्ये या नव्या महाविद्यालयातील ८०० जागांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून मान्यता मिळाली असून, आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमधील प्रवेशाला सुरुवात होईल.
– दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग