शहर

सवंग लोकप्रियतेसाठी एसटीत प्रवाशांना सवलती; परतावा देण्यात सरकार अपयशी – श्रीरंग बरगे

मुंबई : 

सवंग लोकप्रियतेसाठी राज्य सरकारने एसटी प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत, मात्र त्याचे सवलत मुल्य परतावा एसटीला देण्यात सरकार अपयशी ठरले असून चक्क तोंडघशी पडले असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

राज्य सरकारकडून एसटी बसमध्ये विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. त्याची साधारण ३५० कोटी रुपये इतकी रक्कम दर महिन्याला होत असून, सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती होत नाही. ही रक्कम एसटीला देताना सरकारने कधीच पूर्णपणे दिलेली नाही. सन २३-२४ च्या अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रक्कमेतील ६१२ कोटी रुपये इतकी रक्कम अजूनही सरकारने दिली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली रक्कम त्या – त्या संस्थांना भरण्यात आलेली नाहीत. या शिवाय इतरही सर्व देणी प्रलंबित आहेत. या रकमा न भरल्यास त्याचा मोठा फटका भविष्यात एसटी कर्मचारी आणि एसटी महामंडळाला बसणार आहे. या देणी वेळेत सरकारने न दिल्यास लवकर एसटी महामंडळ बंद करण्याची वेळ येईल, अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

थकीत रक्कम खालील प्रमाणे

  • भविष्य निर्वाह निधी ७५० कोटी रुपये
  • उपदान १०५० कोटी रुपये
  • एसटी बँक ९० कोटी रुपये
  • रजा रोखिकरण ६० कोटी रुपये
  • एल.आय.सी.१० कोटी रुपये
  • कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले ५ कोटी रुपये

या शिवाय एसटीला सामान व इंधन पुरवणारे पुरवठादार यांची अंदाजे १५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून या पुढे डिझेलसाठी व सामानासाठी गाड्या उभ्या राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पी एफ, ग्रॅज्युटी व एलआयसी सारख्या रक्कमा न भरणे ही जोखीम आहे. या रकमा न भरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळणे अवघड होईल. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा कणा मोडला जाण्याची शक्यता असल्याची भीती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

हे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून सरकारने एसटी व एसटी कर्मचारी यांना आर्थिक खिळखिळे करून ठेवले आहे. खिळखिळ्या एसटीचा आवाज सरकारला येत नाही का? सरकार बहिरे झाले आहे का? असा सवालही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *