आरोग्य

पक्षाघात रुग्णांसाठी चार जिल्ह्यांमध्ये सुरू करणार फिरते पक्षाघात केंद्र

मुंबई :

पक्षाघात आलेल्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास त्याची प्रकृती सुधारण्याची अधिक शक्यता असते. ही बाब लक्षात घेता राज्यातील चार जिल्ह्यांमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये फिरते पक्षाघात केंद्र (mobile brain stroke centre) सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी ७५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांपासून पक्षाघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पक्षाघाताचा झटका आलेला रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्यास होणारा त्रास कमी होण्याची शक्यता असते. मात्र अनेक रुग्ण हे वेळेवर रुग्णालयामध्ये पोहचू शकत नसल्याने त्यांना दीर्घकालीन अपंगत्वाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमधील चार वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये पाच फिरते पक्षाघात केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र अद्ययावत, सीटीस्कॅन, सीसीटीव्ही युक्त असणार आहे. हे केंद्र मुंबईमध्ये जे.जे. रुग्णालय, पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि चंद्रपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी राज्य सरकारने १५ कोटी असे ७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या पाच फिरते पक्षाघात केंद्रांच्या उभारणीसाठी लवकर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, टर्न की पद्धतीने ही केंद्र सुरू केली जाणार आहेत.

वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयांसाठी सुरू करण्यात येणारे फिरते पक्षाघात केंद्र हे नियंत्रण कक्षाशी जोडलेले असणार आहेत. एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा नियंत्रण कक्षाकडे दूरध्वनी आल्यास हे फिरते पक्षाघात केंद्र तातडीने रुग्णाच्या पत्त्यावर पोहचणार आहे. यामध्ये असलेले डॉक्टर तातडीने रुग्णाची सीटी स्कॅन यंत्राद्वारे तपासणी करतील. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी आढळल्यास डॉक्टर तातडीने त्याच्यावर उपचार करतील, योग्य वेळेत रुग्णांना उपचार मिळाल्याने रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाल्याने रक्त प्रवाह थांबतो किंवा रक्तवाहिनी फुटते. त्यामुळे मेंदूचे नुकसान होऊन व्यक्तीला दीर्घकालीन अपंगत्व येण्याची शक्यता असते. हे फिरते पक्षाघात केंद्र अतिदक्षता विभागाप्रमाणे कार्य करणार आहे. त्यामुळे पक्षाघाताचा झटका आल्यानंतर वेळेवर रुग्णालयात पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *