मुंबई :
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) प्रवेशासाठीचे पात्रता निकष बदलत पर्सेंटाईल कमी केले आहेत. सर्वसामान्य प्रवर्गाचे पर्सेंटाईल ५० वरून २८.३०८ इतके केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच नव्या पात्रता निकषानुसार एक विशेष प्रवेश फेरी लवकरच राबविण्यात येणार आहेत.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी राज्यामध्ये साधारणपणे ५२६ जागा आहेत. या जागांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत. त्यानुसार आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि दोन स्ट्रे फेऱ्या राबविण्यात आल्या होत्या. या पाच फेऱ्यांनंतरही राज्यामध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या जवळपास ६५ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे या रिक्त जागा भरण्यासाठी आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने प्रवेश फेरीसाठीचे पात्रता निकष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निकषानुसार खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असलेले ५० पर्सेंटाईल किंवा २६३ गुण कमी करून २८.३०८ पर्सेंटाईल किंवा १९६ गुण इतके कमी करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गाप्रमाणे आरक्षित प्रवर्गासाठी असलेले ४० पर्सेंटाईल किंवा २३० गुण कमी करून १८.३०८ पर्सेंटाईल किंवा १६४ गुण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेले ४५ पर्सेंटाईल किंवा २४६ गुण कमी करून २३.३०८ पर्सेंटाईल आणि गुण १८० इतके कमी करण्यात आले आहेत. आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांमधील जागा अद्याप रिक्त आहेत, अशा दंत महाविद्यालयातील जागा भरण्यास मदत होणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आतापर्यंत ५२६ जागांसाठी राबविण्यात आलेल्या तीन नियमित फेऱ्या आणि दोन स्ट्रे फेऱ्याअंतर्गत बहुतांश प्रवेश झाले असून, जवळपास ६५ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांसाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. नव्या निकषानुसार जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांना या विशेष फेरीसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. या फेरीसाठी रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थांनी पहिल्या फेरीवेळी नोंदणी केली आहे. त्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता नसून, त्यांना फक्त महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे आवश्यक असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
असे आहे विशेष फेरीचे वेळापत्रक
- प्रवेश शुल्कासह ऑनलाईन नोंदणी – १४ ते १६ ऑक्टोबर
- अंतरिम गुणवत्ता यादी – १७ ऑक्टोबर
- महाविद्यालय ऑनलाई पसंतीक्रम भरणे – १८ व १९ ऑक्टोबर
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – २१ ऑक्टोबर
- प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे – २२ ते २५ ऑक्टोबर