मुंबई :
वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने गंभीर हृदयविकाराने ग्रासलेल्या अनेक तरुण रुग्णांवर उपचार केले आहेत. तथापि, यातून युवकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांत चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, हॉस्पिटल्सने हृदयविकारांच्या वाढत्या प्रमाणाला प्रतिबंध करण्यासाठी त्वरित निदान आणि जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. नजीकच्या काळात, वोकहार्ट हॉस्पिटल्सने हृदयविकाराचा झटका आलेल्या २९, ३४ आणि ३६ वर्षे वयाच्या व्यक्तींवर उपचार केले आहेत. यामागे धूम्रपान, ताण, चुकीचा आहार आणि लठ्ठपणा ही जीवनशैलीतील मुख्य कारणे समोर आली आहेत.
प्रकरण १ : ३४ वर्षीय शहबाज खान
शहबाज खान हा सिगारेटच्या आहारी गेलेला, मांसाहार करत असलेला रुग्ण हॉस्पीटलमध्ये आला. शहबाजच्या मुख्य कोरोनरी धमनित ९५ टक्के ब्लॉकेज होते. वोकहार्ट हॉस्पिटल्सचे कंसल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. परीन संगोई यांनी प्राथमिक अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फार्क्शन (PAMI) करून शहबाजचा रक्त प्रवाह पूर्ववत केला. डॉ. संगोई यांनी याबाबत सांगितले की, “हे प्रकरण धूम्रपान आणि आरोग्यासाठी अहितकारक ठरलेल्या आहाराच्या सेवनाने झालेल्या गंभीर परिणामांचे उदाहरण आहे. यात मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या हृदयविकाराला सर्वाधिक कारणीभूत मानल्या जाणाऱ्या पारंपारिक उच्च जोखमीच्या समस्या नसल्या तरी जीवघेणी स्थिती निर्माण करू शकतात.”
प्रकरण २ : २९ वर्षीय ओमकार वाघधरे
ओमकार वाघधरे हा केवळ 29 वर्षांचा तरुण हृदविकाराने ग्रासला होता. लठ्ठपणा आणि ताण याबरोबरच व्यवसायातील नुकसानीमुळे वाढलेला मानसिक ताण हे त्याच्या हृदविकारमागचे कारण होते. त्याचे वजन 105 किग्रॅ होते आणि त्याच्या धमन्यांमध्ये 95% ब्लॉकेज आढळले. डॉ. संगोई यांनी अँजिओप्लास्टी करून त्याचे प्राण वाचवले आणि नमूद केले की, “तरुणांमधील ताण आणि लठ्ठपणा जैविक वृद्धत्व वाढवू शकतो. यामुळे अशा व्यक्ती हृदयविकारांना त्वरित बळी पडतात. ओमकारचा जीव वाचवण्यासाठी त्वरित निदान आणि तात्काळ उपचार आवश्यक होते.”
प्रकरण ३ : ३६ वर्षीय विजय शिंदे
३६ वर्षीय विजय शिंदे या तरुणाला दीर्घ काळापासून अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या होती. हृदयविकाराच्या झटक्याने व हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. अँजिओग्राफी केल्यानंतर त्याच्या धमन्यात रक्ताच्या मोठ्या गुठळ्या आणि ब्लॉकेज आढळले. डॉ. संगोई यांनी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करून उपचार केले आणि याबाबत सांगितले की, “दीर्घकालीन, अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे आयुष्यावर धोकादायक परिणाम होऊ शकतात. विजयच्या प्रकरणात हे दिसून आले आहे. यातून असे दिसून येते की, अशा परिस्थितीत शरीराचे सातत्याने व्यवस्थापन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
वॉकहार्ट हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या तरुण रुग्णांमधील हृदयविकाराची वाढती समस्या चिंताजनक आहे. डॉ. सांगोई यांनी सांगितले की, “यासाठी चुकीचा आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि ताण ही जीवनशैलीतील मुख्य कारणे जबाबदार ठरत आहेत. तरुणांनी या जोखमी ओळखल्या पाहिजे आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पावले उचलली पाहिजेत.”
वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलचे केंद्र प्रमुख, डॉ. विरेंद्र चौहान यांनी सांगितले की, “तरुणांमधील हृदयाच्या समस्यातील चिंताजनक वाढ आपल्या सर्वांना जागरूक करण्याचे काम करत आहे. यासाठी आपण विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधक आरोग्यसेवेला प्राधान्य देणे, नियमित तपासण्या करणे आणि तरुण पिढीसाठी हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी जागरूकता वाढविणे आवश्यक आहे.”
जागतिक हृदय दिनानिमित्त उपक्रमांचा एक भाग म्हणून, वोकहार्ट हॉस्पिटल्सने लोकांना त्वरित निदान आणि नियमित आरोग्य तपासण्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून गंभीर विकार होण्याआधी हृदयाची स्थिती ओळखता येईल. विशेषतः जीवनशैलीशी संबंधित जोखमी असलेल्या लोकांसाठी नियमित तपासण्या आवश्यक आहेत, कारण योग्य वेळी केलेले वैद्यकीय हस्तक्षेप जीव वाचवू शकतात.