मुंबई :
विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज मॅट्रिझने केलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. निवडणुकीत महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेतून काढण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांना ४० टक्के जनतेने पसंती दिली आहे.
मॅट्रिजने महाराष्ट्रातील जनतेचा कौल एका सर्व्हेतून जाणून घेतला. यात महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. महायुतीला निवडणुकीत जवळपास ४७ टक्के मते मिळतील. तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळतील आणि त्यांचे मतांचे प्रमाण ४१ टक्क्यांच्या आसपास राहील. या निवडणुकीत ० ते ५ जागा अपक्षांना मिळतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्वेक्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कामकाज अतिशय चांगले असल्याचा मत ४२ टक्के जनतेने व्यक्त केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निवडणुकीत सर्वात प्रभावी ठरेल, असे ५८ टक्के लोकांनी म्हटले आहे. या सर्व्हेत ४४ टक्के दलित मतदारांनी महायुतीला पसंती दिली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना ४० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना २१ टक्के, देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के, शरद पवार यांना १० टक्के लोकांनी पसंती दिली.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, ठाणे-कोकण, मुंबई या सर्वच विभागांमध्ये महायुतीला बहुमत मिळेल, असे स्पष्ट संकेत या सर्व्हेतून देण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७० पैकी महायुतीला ३१ ते ३८ जागा मिळतील. विदर्भात ६२ पैकी ३२ ते ३७ जागा, मराठवाड्यातील ४६ पैकी १८ ते २४ जागा महायुती जिंकेल. ठाणे-कोकणात ३९ पैकी २३ ते २५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. मुंबईतील ३६ पैकी २१ ते २६ जागांवर महायुती विजयी होईल, असा अंदाज मॅट्रिझच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.