मुंबई :
जून ते सप्टेंबर पावसाळी हंगामात टायफॉईड आणि इतर प्राणीजन्य आजारांच्या दाव्यांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. या वर्षीच्या लांबलेल्या पावसाळ्यामुळे टायफॉइडच्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे. पावासाळ्यात सामान्यपणे ज्या आजारांची वाढ दिसून येते, त्या तुलनेने टायफॉइडसाठी केलेल्या दाव्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. यात विषाणूंचा संसर्ग हे सर्वाधिक आढळलेले कारण होते. या वरून या आजारांचा प्रभाव असलेल्या भागांमधील सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीतीतल बदल दिसून येतो.
टायफॉइड व्यतिरिक्त या पावसाळ्यात ॲक्युट गॅस्ट्रोएंटरायटिस (एजीई), विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि न्यूमोनिया हे संसर्गजन्य आजार सर्वाधिक प्रमाणात आढळून आले. या सर्व आजारांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये ३६ टक्के वाढ दिसून आली. प्राणीजन्य आजारांमुळे २४ टक्के वाढ दिसून आली. या आजारांचा विविध राज्यांमध्ये असलेला प्रभावही लक्षणीय होता. आर्थिक वर्षी २०२५ मध्ये या संसर्गजन्य आजारांसाठी करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व गुजरातमधून सर्वाधिक प्रमाणात दावे करण्यात आले. २०२४ मध्ये स्थिती वेगळी होती. त्या वर्षात महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणामध्ये या आजारांचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला होता. या आजारांवरील उपचारांच्या खर्चातही किंचित बदल झालेला दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी विषाणूजन्य आजारांसाठी प्रति-दिन दाव्याच्या खर्चात २ टक्के वाढ दिसून आली. प्रति दाव्यामागे वाढलेल्या खर्चाचे कारण म्हणजे उच्च श्रेणीची औषधे. या कालावधीत विषाणूजन्य संसर्गासाठी वारंवार लागणारी व्यापक उपचारांची गरज यातून प्रतिबिंबीत होते. अशा रुग्णांचा हॉस्पिटलमधील वास्तव्याचा कालावधी सरासरी ३.५ दिवस होता, जो मागील वर्षाप्रमाणेच होता. दाव्याची रक्कम नऊ हजारांपासून ते कमाल ६ लाख ८० हजारांपर्यंत होती.
झुनो जनरल इन्शुरन्सच्या स्ट्रॅटजी विभागातील चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर नितीन देव म्हणाले, “टायफॉइडच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ ही दूषित पाणी किंवा अन्नपदार्थ यांची परिणीती होती. यातून लांबलेल्या पावसाळ्याचे परिणाम दिसून येतात. या परिणाम प्रामुख्याने पालघर, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली एनसीआरमध्ये दिसून आला. संसर्गामध्ये झालेली ही वाढ पर्यावरणीय घटक आरोग्याच्या परिणामांवर सातत्याने प्रभाव टाकत असल्याचे महत्व अधोरेखित करते. झुनो या बदलांवर लक्ष ठेवून योग्य विमा संरक्षण देण्यास वचनबद्ध आहे, जेणेकरून आपल्या पॉलिसीधारकांना आरोग्याला निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांपासून संरक्षण मिळेल.”
मागील वर्षाप्रमाणेच, यंदाही ३१ ते ४५ वयोगटातील प्रौढांमध्ये रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले. या वयोगटातील रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्के वाढ झाली आहे. या वयोगटाची वाढलेली संवेदनशीलता व्यापक लोकसंख्याशास्त्रीय ट्रेंड दर्शवते. प्राणीजन्य आजारांचा भार दोन्ही लिंगांमध्ये सारखाच होता. पुरुष व महिलांचे दाव्यांचे प्रमाण ५३ : ४७ असे होते.