मुंबई :
पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका क्षेत्रात २१व्या पशुगणनेला दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रारंभ झाला आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी पशुधनाची गणना केली जाते. पशूसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका क्षेत्रात मोबाईल ॲप्लीकेशनच्या मदतीने पशूगणना करण्यात येईल. प्रगणक घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन पशूपालकांची घरगुती, घरगुती उद्योग आणि गैर-घरगुती उपक्रम इत्यादींमध्ये वर्गवारी करून त्यांच्याकडील उपलब्ध प्राण्यांच्या प्रजाती ( उदा. कुत्री, गुरे, म्हैस, मेंढी, शेळी, कुक्कुट पक्षी) यांची वय, लिंग जातीनुसार मोबाइल अॅप्लीकेशनमध्ये नोंद घेतील.
दिनांक २५ नोव्हेंबरपासून राज्यभरात पशुगणनेस सुरुवात झाली असून दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ती सुरू राहील. या कालावधीदरम्यान आपल्या घरी पशुगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी माहिती उपलब्ध करुन द्यावी तसेच सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.