आरोग्य

जे.जे. रुग्णालयात देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय सुरू

मुंबई :

भारतातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास पाहण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. या संग्रहालयामध्ये सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या ऐतिहासिक १८० वर्षाच्या प्रवासाबरोबरच आधुनिक वैद्यक व वैद्यकीय शिक्षणाचा इतिहास सर्वांसमोर उलगडला जाणार आहे.

१८४५ मध्य जे. जे. रुग्णालयाची उभारण्यात आलेली इमारत आजही अस्तित्त्वात आहे. मे २०२४ मध्ये जे.जे. रुग्णालयाने १८० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने या इमारतीमध्ये भारतातील पहिले वैद्यकीय शिक्षण व संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कनिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या वैद्यकीय संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील यांनी पूर्ण केले. या पहिल्या टप्प्यातील संग्रहालयाचे ५ डिसेंबर रोजी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि उपअधिष्ठाता डॉ. गजानन चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

जे.जे. रुग्णालयाला १८० वर्षांची समृद्ध वैद्यकीय शिक्षणाची आणि उपचारांची परंपरा आहे. हे रुग्णालय सुरु करण्यासाठी सर जमशेटजी जीजीभॉय यांनी १६ मार्च १८३८ रोजी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले संपूर्ण रुग्णालय या देणगीमधून उभारण्यात आले होते. त्यानंतर १५ मे १८४५ हा ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जमशेटजी जीजीभॉय रुग्णालय (जे.जे. रुग्णालय) सामान्य जनता आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. हा सर्व वैभवशाली इतिहास या संग्रहालयातून नागरिकांसमोर उलगडण्यात आला आहे.

तसेच ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या १८४५ च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी तसेच वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले माजी विद्यार्थी व डॉक्टर यांचा इतिहास या संग्रहालयातून उलगडण्यात आला आहे. यामध्ये डॉ. भाऊ दाजी लाड, संस्कृत विद्वान डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. सखाराम अर्जुन, तसेच ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे डॉ. विठ्ठल शिरोडकर, डॉ. खान अब्दुल जब्बार खान, डॉ. जीवराज मेहता, डॉ. एस. जे. मेहता, डॉ. द्वारकानाथ कोटनीस, डॉ. नोशिर एच. ॲटीया, डॉ. बोमसी वाडिया, डॉ. रुखमाबाई राऊत, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त नामांकित डॉ. फारुख उडवाडीया आदींचा समावेश आहे.

कधी पाहता येईल

हे संग्रहालय सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. मात्र रविवार आणि इतर शासकीय सुट्टीच्या दिवशी संग्रहालय बंद राहणार आहे.

हे संग्रहालय पाहणे हा वैद्यकीय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी अनुभव असणार आहे. त्यामुळे या संग्रहालयाला सर्वांनी भेट द्यावी.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *