आरोग्य

कामा रुग्णालयामध्ये प्लेटलेटयुक्त प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू

मुंबई :

काही महिलांच्या अंडाशयाची क्षमता कमी असल्याने त्यांना वंधत्वासह गर्भधारणेच्या अनेक समस्यांना सामारे जावे लागते. ही बाब लक्षात घेत कामा रुग्णालयामध्ये अशा महिलांसाठी प्लेटलेटयुक्त प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. यामुळे महिलांच्या अंडाशयातील अपक्व स्त्रीबीज सुधारण्यास मदत होईल, तसेच गर्भधारणा राहण्यास मदत होणार आहे.

अंडाशयाची क्षमता कमी असल्याने काही महिलांच्या गर्भामध्ये स्त्रीबीज निर्माण होण्यात अडचणी येत असतात. यामुळे या महिलांना वंधत्वाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या महिलांसाठी विशेष रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयामध्ये प्लेटलेटयुक्त प्लाझ्मा (पीआरपी) उपचार पद्धती सुरू केली. या उपचार पद्धतीमुळे महिलांना देण्यात येणाऱ्या पीआरपी इंजेक्शनमुळे त्यांच्या अंडाशयाचे कार्य सुधारून स्त्रीबीजची गुणवत्ता क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत होते. पीआरपी उपचार पद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या इंजेक्शनमुळे अंडाशयातील फोलिकल्सच्या विकासास उत्तेजन मिळून उच्च-गुणवत्तेची अंडी तयार होतात. त्याचप्रमाणे या इंजेक्शनमुळे गर्भाशयाच्या अस्तराची जाडी आणि गुणवत्ता वाढते, ज्यामुळे भ्रूण रोपणासाठी चांगले गर्भाशय मिळण्यास मदत होते. तसेच जननेंद्रियातील रक्त प्रवाह आणि ऊतींचे आरोग्य सुधारून लैंगिक प्रतिक्रिया वाढवते. ज्या महिलांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे, अशा महिलांन या पीआरपी उपचार पद्धतीचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ होतो, त्यामुळे वंधत्व असलेल्या महिलांसाठी ही उपचार पद्धतील लाभदायक ठरणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

पीआरपी पद्धतीचा वापर

पीआरपी सामान्यतः अस्थिव्यंगशास्त्रामध्ये लिगामेंटच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी, ऊतक बरे करण्यासाठी, वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी, केस गळती उपचार आणि त्वचेच्या उपचारांसाठी त्वचाविज्ञानात, कॉर्नियाच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी नेत्ररोगशास्त्रात आणि दुखापतींवर उपचार करण्यासाठी क्रीडा प्रकारात दुखापत झाली असल्यास आणि कॉस्मेटिकमध्ये या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात अलीकडेच त्याचा वापर वाढू लागला आहे.

पीआरपी म्हणजे काय

पीआरपी उपचार पद्धती ही सोपी आणि सुलभ प्रक्रिया आहे. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या शरीरातून, सामान्यतः हातातून थोड्या प्रमाणात रक्त घेतले जाते. या रक्ताचे विलगीकरण करून त्यातून प्लेटलेट्स व प्लाझ्मा अन्य घटकांपासून वेगळे केले जातात. संपूर्ण शरीरामध्ये झालेली दुखापत बरी करण्यामध्ये प्लेटलेट्स महत्त्वाची भूमिका बजावते. प्लेटलेट्स हे रक्त गोठवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी त्यामध्ये वाढीचे घटक देखील असतात. हे घटक पेशी पुनरुत्पादनास चालना देतात आणि उपचार केलेल्या भागात ऊतींचे पुनरुत्पादन किंवा बरे होण्यास उत्तेजित करतात. रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यातून प्लेटलेटयुक्त प्लाझ्मा तयार केल्यानंतर, ते अल्ट्रासाऊंड मार्गदर्शनाखाली गर्भाशय किंवा अंडाशयात एका विशिष्ट भागात इंजेक्शनद्वारे दिले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *