मुंबई :
सीबीएसई व अन्य मंडळाच्या बारावीची परीक्षा आणि सीईटी एकाच वेळी होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आलेल्या विनंतीची दखल घेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटीच्या संभाव्य वेळापत्रकातील पाच अभ्यासक्रमांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत दोन आणि उच्च शिक्षण विभागाच्या तीन अशा पाच अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखेत बदल केला आहे. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करता यावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून १९ अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी)चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या परीक्षेसाठीची अर्ज नोंदणीही सुरु करण्यात आली आहे. मात्र १ ते ४ एप्रिल दरम्यान सीबीएसई मंडळाची बारावीच्या परीक्षेचे इतिहास, भाषा विषय, होम सायन्स आणि मानसशास्त्र हे चार पेपर होणार आहेत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने १ ते ४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. याची दखल घेत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने तंत्रशिक्षण विभागाच्या दोन आणि उच्च शिक्षण विभागाच्या तीन अशा पाच अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. यासंदर्भातील सुधारित तारखा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.
या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
- बीएड आणि एमपीएड – १९ मार्च
- एमपीएडची फिल्ड चाचणी – २०, २१ मार्च
- एमबीए/ एमएमएस – १ ते ३ एप्रिल
- बीबीए/बीसीए/बीबीएम – २९, ३० एप्रिल आणि १ मे
- एलएलबी पाच वर्ष – २८ एप्रिल