नवी दिल्ली :
नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेने जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि अनेकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरlला. या स्पर्धेची सुरुवात २३ देशांच्या सहभागासह सांस्कृतिक महोत्सवाने झाली, ज्यात सहा खंडांतील संघ सहभागी झाले होते. उत्कृष्ट संगीत, नृत्य सादरीकरणांनी सजलेल्या भव्य उद्घाटन समारंभाने स्पर्धेला सुरुवात झाली. भारतीय आदरातिथ्याचा सुखद अनुभव आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडूंनी घेतला, आणि रोमहर्षक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय संस्कृती अनुभवणे हा आनंददायी प्रवास होता. भारतात प्रथमच आलेल्या इराणच्या अमीर घियासी यांनी सांगितले. भारतामध्ये येण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव होता, आणि तो खूप सुंदर ठरला. आदरातिथ्य अप्रतिम होते. आम्ही येथे पोहोचल्यापासून सर्व गोष्टी व्यवस्थित व नियोजनबद्द होत्या. आम्हाला आमच्या गरजेनुसार आदरतिथ्य पुरविण्यात आले. भारतीय संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाली, आणि ती खरोखरच अद्भुत होती.
न्यूझीलंड महिला संघातील भारतीय वंशाच्या अमनदीप कौर यांनीही भारतीय आदरातिथ्याचे कौतुक करत सांगितले, “स्पर्धा खूप आव्हानात्मक होती, जे आम्हाला अपेक्षित नव्हते. आम्ही स्पर्धेत खेळण्याचा खूप आनंद घेतला. पुढील स्पर्धेसाठी अधिक मेहनत घेण्यासाठी आम्हाला आत्मविश्वास या स्पर्धेतून मिळाला आहे.”
व्यवस्थापनाचे कौतुक
स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) चे अध्यक्ष सुधांशू मित्तल, सरचिटणीस एम.एस. त्यागी, आणि आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस रोहित हल्दानिया यांनी घेतली होती. प्रत्येक संघाच्या गरजांनुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या.
अमनदीप कौर पुढे म्हणाल्या, “भारतीयांनी जे वातावरण तयार केले, ते खेळाडूंना अतिशय आवडले. सर्व देश एकत्र येऊन खेळाचा आनंद घेताना पाहणे अद्भुत होते. कोणत्याही समस्यांवर त्वरित उपाय केले जात होते. डॉक्टर्स, फिजिओ, अन्न आणि पेय यांची व्यवस्था उत्कृष्ट होती. भारत हा या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट यजमान ठरला आहे.”
भारतीय संस्कृतीचा अनुभव व सफर
आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भारतीय संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांनी आग्र्यातील ताजमहाल पाहिला आणि भारतीय स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला. पेरू पुरुष संघाचे प्रशिक्षक सिल्वाना पॅट्रिशिया म्हणाले, “इथले आदरातिथ्य, अन्न, संगीत, नृत्यप्रदर्शन अप्रतिम होते. प्रत्येक ठिकाणी पाहण्यासारखे इतके काही आहे की, तुम्हाला सगळीकडे एकाच वेळी पोहोचायचे आहे असे वाटते. हा अनुभव अप्रतिम होता.”
ब्राझील पुरुष संघाचे प्रशिक्षक लौरा डोएरिंग म्हणाले, “भारतीय संस्कृती आमच्या संस्कृतीपेक्षा खूप वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना आम्ही खूपच प्रभावित झालो आहोत. येथे आल्याचा खूप आनंद आहे. इथली माणसं खूप चांगली आहेत, आणि आदरातिथ्य ही सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. भारतीय नृत्याचे काही प्रकार शिकून ते आम्हाला आमच्यासोबत घेऊन जायचे आहे.”
खेळातून सांस्कृतिक बंध वाढवणारी स्पर्धा
भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत आणि खो-खोचा उत्साह अनुभवत, या स्पर्धेने आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एकत्र आणले. या पहिल्या विश्वचषकाने केवळ खेळासाठीच नव्हे, तर संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठीही एक अनोखे व्यासपीठ उभे केले.