
मुंबई :
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे आज काही अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक सामने खेळले गेले. ही स्पर्धा २६ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.
किशोर गटाचा थरार
४ फुट ११ इंच किशोर गटाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती मंदिराचा (मध्यंतर ११-२) ११-५ असा १ डाव व ६ गुणांनी धुवा उडवला. ओम साईश्वरतर्फे अधिराज गुरवने नाबाद १ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ६ गडी बाद केले. आरव साटमने ३:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. अर्णव राणेने २:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. पराभूत सरस्वती तर्फे पार्थ केळकरने १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. आदित्य सोनारने १:१० मिनिटे संरक्षण केले.
व्यावसायिक महिला गटाच्या रोमांचक लढती – महाराष्ट्र पोष्टाची कडवी झुंज अपयशी
व्यावसायिक महिला गटाच्या पहिल्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोष्टाचा (मध्यंतर ५-४) ९-८ असा १:५० मिनिटे राखून १ गुणाने पराभव केला. रचना तर्फे सेजल यादवने २:३०, ३:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. पूजा फरगडेने २:४०, २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. काजल शेखने नाबाद १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर पराभूत महाराष्ट्र पोष्टातर्फे किशोरी मोकाशीने ३:१०, ४:४० मिनिटे संरक्षण केले. खुशबू सुतारने १:३०, २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ खेळाडू बाद केले.
महावितरण कंपनीने मुंबई पोलीसांचा केला पराभव
दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने मुंबई पोलीसचा मोठा पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला ९-३ अशी सहा गुणांची आघाडी महावितरणने घेतल्याने मुंबई पोलिसांना डावाने पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात मुंबई पोलिसांनी महावितरणचे ५ खेळाडू बाद करण्यात यश मिळवले. व हा सामना महावितरणने एक डाव राखून ९-८ असा सहज जिंकला.
पश्चिम रेल्वेकडून मुंबई पोलीस गारद
व्यावसायिक पुरुष गटाच्या पहिल्या सामन्यात पश्चिम रेल्वेने मुंबई पोलीसाचा (मध्यंतर ११-५) ११-९ असा १ डाव २ गुणांनी पराभव केला. पश्चिम रेल्वेतर्फे दिपक माधवने २, नाबाद १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. निखिल सोडयेने २:१०, २ मिनिटे संरक्षण केले. अमित पाटीलने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. पराभूत मुंबई पोलीसतर्फे सोहेल कलावंतने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले तर अक्षय हजारे व लोकेश भडवलकरने प्रत्येकी २ गडी बाद केले.
महाराष्ट्र पोस्टाकडून महावितरण कंपनीचा धुव्वा
व्यावसायिक पुरुष गटाच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र पोष्टाने महावितरण कंपनीचा (मध्यंतर १३-४) १३-११ असा १ डाव व २ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र पोष्टातर्फे लक्ष्मण गवसने नाबाद १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. शुभम शिगवण व शुभम शिंदेने प्रत्येकी २ मिनिटे संरक्षण केले. तर पराभूत महावितरणतर्फे चेतन बडदेने आक्रमणात २ गडी बाद केले.