शिक्षण

बीएस्सी नर्सिंग, विधी अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास सीईटी सेलकडून मुदतवाढ

मुंबई :

बीएस्सी नर्सिंग आणि विधी तीन वर्ष, विधी पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला १० मार्चपर्यंत तर विधी तीन वर्षे व पाच वर्ष अभ्यासक्रमांसाठी १७ मार्चपर्चंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे या अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी डिसेंबरमध्ये परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यामध्ये विविध अभ्यासाक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार आहेत. त्यामुळे काही अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया संपुष्टात आली आहे, तर काही अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र विधी तीन वर्ष व पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला २८ जानेवारी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुदत दिली होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत जवळपास २७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट स्थितीमध्ये किंवा अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला १० मार्चपर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ११ हजार २८० जागा आहेत. गतवर्षी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून ५८ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ९ हजार २४४ जागांवर प्रवेश झाले. यामध्ये ६ हजार ७०८ मुली तर २ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

दरम्यान विधी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली होती. २८ फेब्रुवारी अंतिम मुदत होती. तसेच विधी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ३ जानेवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना अर्ज नोंदणी करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गतवर्षी विधी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ८० हजार १२५ विद्यार्थ्यांनी तर विधी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ३४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *