
मुंबई :
२२ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कालिकत विद्यापीठ कालिकत येथे झालेल्या अखील भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत देशभरातील १६ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठ महिला खो खो संघाने साखळी सामन्यात मंगलोर विद्यापीठाचा १ गडी आणि १ पाळी राखून पराभव केला. तसेच हेमचंद यादव विश्व विद्यालय दुर्ग या संघाचा १ डाव ३ गुणांनी पराभव केला. पंजाबी विद्यापीठ चंदिगड या संघाचा १२ गुणांनी पराभव करून उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात केआयटी विद्यापीठ भुवनेश्वर या संघाचा १ गुण आणि १ पाळी राखून पराभव केला. उपांत्य फेरी मुंबई विद्यापीठ व कालिकत विद्यापीठ यामध्ये झाली. यामध्ये अतितटीच्या लढतीत मुंबई विद्यापीठास तृतीय स्थान मिळाले.
मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये गीतांजली नरसाळे,साक्षी तोरणे,पूजा फरगडे,किशोरी मोकाशी, अपर्णा खंडागळे, सानवी तळवडेकर, दिव्या गायकवाड, रोशनी जूनगरे,श्वेता जाधव,पायल पवार,श्रिया नाईक, श्रेया सनगरे,काजल शेख,कल्याणी कंक या खेळाडूंचा सहभाग होता. संघाला मनोज पवार, रोहिणी डोंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महिला खो खो संघाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी या चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.