
मुंबई :
भारतातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा (एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस) आजपासून मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे. सुमारे २० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या अद्ययावत सुविधेमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जात आहे. देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः विद्यापीठांमध्ये ही प्रगत सुविधा सुरु करणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, टीआयएफआरमधील प्राध्यापक एम.एन. वाहिया, एमयु एक्सलरेटर सेंटरच्या प्रमुख प्रा. वर्षा केळकर माने, डॉ. सिद्धार्थ कस्तुरीरंगन आणि डॉ. अभिजीत भोगले यांच्यासह चमुच्या उपस्थितीत करण्यात आली.
मुंबई विद्यापीठात कार्यान्वित होत असलेल्या या सुविधेमुळे पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे केंद्र सज्ज असून ५० हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परीणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या केंद्राकडे आहे. भारतातील अत्यंत प्राचीन संस्कृती आणि मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणूऊर्जेच्या संशोधनात हे केंद्र महत्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई विद्यापीठातील या सुविधा फक्त पुरातत्त्वीय समुदायांच्या गरजा पूर्ण करणार नाही तर भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे. हा अत्याधुनिक एक्सलरेटर नेदरलँडमधील एचव्हीईई कंपनीकडून विकत घेण्यात आला आहे.
भारतीय शास्त्रज्ञ आणि उद्योगांना होणार लाभ
कार्बन डेटिंगसाठी एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री (एएमएस) या कालमापन यंत्राची सुविधा ही बीआरएनएस प्रकल्प आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्यातून साकारण्यात आली असून मुंबई विद्यापीठातील भौतिक शास्त्र विभागातील माजी प्राध्यापक डॉ. डी. सी. कोठारी आणि टीआयएफआरमधील प्राध्यापक एम.एन. वाहिया यांच्या पुढाकारातून या प्रकल्पावर काम केले गेले. मुंबई विद्यापीठातील या अद्ययावत कार्बन डेटिंग एक्सलरेटर सेंटर प्रकल्पाचे वैशिष्ट्ये म्हणजे या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादीत न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व भारतीय शास्त्रज्ञाना आणि उद्योगांना होणार आहे.
पुरातत्व समुदायाचे स्वप्न सत्यात उतरणार
मुंबई विद्यापीठाने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल असून भारतीय पुरातत्व समुदायाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. आजमितीस कार्बन डेटिंगसाठीचे नमुने हे परदेशात पाठविले जातात ज्यासाठी जवळपास ६०० डॉलर्स इतका खर्च येतो, भारतातील विशेषतः मुंबई विद्यापीठात या केंद्राच्या सहाय्याने आता पुरातत्व शास्त्राशी निगडीत गरजा भागविण्यासाठी मुंबई विद्यापीठ सज्ज होत आहे. या मशीनच्या सहाय्याने कोणत्याही ऐतिहासिक वस्तूची अचूक परिणामकारता शोधून काढणे शक्य होणार आहे. भारताला मोठा ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन व समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यादृष्टिने पुरातत्व आणि प्राचीन संस्कृती बरोबरच इतिहासाची उकल करण्यास येथील विद्यार्थी, संशोधकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या जगात अशा ४५ मशीन कार्यान्वित असून युरोपमध्ये २२, अमेरिकेत ९, जपानमध्ये ८, ऑस्ट्रेलियात ३, न्यूझीलंड कॅनडा, चीन आणि कोरीया येथे प्रत्येकी १ मशीन आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत संशोधन क्षेत्रे
- रेडिओकार्बनसाठी AMS पुरातत्वशास्त्रीय नमुने डेटिंग
- पुरातत्त्वीय साइट्स आणि नमुने यांचे डेटिंग
- दुर्मिळ वस्तूंवरील सूक्ष्म नमुन्यांची डेटिंग
- विषम पदार्थात वैयक्तिक अपूर्णांकांचे विश्लेषण.
कॅलिब्रेशन : कॅलिब्रेशनसाठी भारतीय डाटाबेस तयार करणे.
परमाणु उद्योगासाठी : अणुऊर्जा प्रकल्पातून 14C ची मापन
तलावाच्या तळघरणाची डेटिंग : तळाच्या आत वैयक्तिक स्तरावर डेटिंग
बायोमेडिकल ऍप्लिकेशन्स : अणूच्या पातळीवर मोजमाप, बायोमेडिकल ट्रॅक्टर म्हणून रेडियोआयसोटोपचा वापर.
तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात कसा होतो
१) एखाद्या जीवाचे कालमापन करण्यासाठी : जेव्हा एखादा जीव मरतो तेव्हा कार्बनची देवाणघेवाण होणे थांबते आणि कालांतराने 14 c चा नाश होतो, या मध्ये 12c : 14 c गुंणोत्तर एखाद्या जीवाच्या मृत्यूनंतर निघून गेलेल्या वेळशी संबंधित असतो.
२) एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्रीचा वापर बायोमेडिकल संशोधनात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
३) रेडिओ कार्बन डेटिंगच्या मदतीने, संशोधक एक प्रकारचे घड्याळ म्हणून वापरू शकतात जे त्यांना भूतकाळात डोकावण्यास आणि लाकडापासून ते अन्न, परागकण, मलमूत्र आणि अगदी मृत प्राणी आणि मानवांपर्यंत सर्व गोष्टींसाठी अचूक कालखंड निर्धारित करण्यास अनुमती देते.
मुंबई विद्यापीठाने प्रगत संशोधनाच्या दिशेने उचलेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशातील विद्यापीठांमध्ये अशी अद्ययावत पहिली सुविधा मुंबई विद्यापीठात सुरु होत असल्यामुळे पुरातत्व आणि प्राचीन संस्कृती बरोबरच इतिहासाची उकल करण्यास देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि उद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे.
– प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ