
इचलकरंजी :
कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेत धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि पुणे यांनी आपली ताकद दाखवत प्रत्येकी तीन गटांत उपांत्य फेरी गाठली आहे. ठाणे, सातारा आणि मुंबई उपनगर यांनी प्रत्येकी एका गटात स्थान मिळवत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने इचलकरंजीतील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्र. २१च्या मैदानावर सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विविध गटांमध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
उपांत्य फेरी गाठलेले संघ :
किशोर गट : सांगली, सातारा, धाराशिव, कोल्हापूर, किशोरी गट: पुणे, धाराशिव, ठाणे, सांगली
पुरुष गट : पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर, सांगली, महिला गट: धाराशिव, कोल्हापूर, ठाणे, पुणे
स्पर्धेचा समारोप २७ मार्च रोजी सायंकाळी होणार असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
पुणे आणि मुंबई उपनगरचा शानदार विजय
महिला गटात पुण्याने नाशिकला अत्यंत चुरशीच्या लढतीत १६-१५ अशा एका गुणाने पराभूत केले. मध्यंतराला नाशिकने १०-९ अशी आघाडी घेतली होती. मात्र, पुण्याच्या प्रियांका इंगळे हिने (१.४०, २.३० मिनिटे व ६ गुण) अष्टपैलू खेळ करत विजय खेचून आणला.
पुरुष गटात मुंबई उपनगरने ठाण्याला १६-१५ असा निसटता पराभव दिला. मुंबई उपनगरच्या ओंकार सोनवणेने (२.१०, १.३० मिनिटे व ५ गुण) तर ठाण्याच्या राज संकपाळने (१.३० मिनिटे व ३ गुण) उल्लेखनीय कामगिरी केली.
सांगलीने जादा डावात मुंबईला पराभूत करत थरार निर्माण केला. निर्धारित वेळेत सामना १६-१६ असा बरोबरीत राहिल्यानंतर जादा डावात सांगलीने २८-२६ असा दोन गुणांनी विजय मिळवला. सांगलीच्या अभिषेक केरीपाळेने (१.१०, १ मि. व ७ गुण) अष्टपैलू कामगिरी केली, तर मुंबईकडून वेदांत देसाईने (६ गुण व प्रत्येकी १ मिनिट संरक्षण) संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अन्य निकाल :
पुरुष गट : कोल्हापूर वि. सोलापूर – २१-१८ (३ गुणांनी), पुणे वि. अहिल्यानगर – १४-११ (एक डाव ३ गुणांनी)
महिला गट : धाराशिव वि. सांगली – १०-७ (एक डाव ३ गुणांनी), कोल्हापूर वि. सोलापूर – १८-९ (९ गुणांनी), ठाणे वि. मुंबई – १९-१३ (एक डाव ६ गुणांनी)
उपांत्य फेरी सामने :
- किशोर गट : सांगली वि. सातारा | धाराशिव वि. कोल्हापूर व किशोरी गट : पुणे वि. धाराशिव | ठाणे वि. सांगली
- पुरुष गट : पुणे वि. कोल्हापूर | मुंबई उपनगर वि. सांगली व महिला गट: धाराशिव वि. कोल्हापूर | ठाणे वि. पुणे