
पुरी (ओडिशा) :
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकाविले व अजेय कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि विदर्भच्या संघांनीही पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे.
महाराष्ट्र पुरुष संघाची दमदार कामगिरी
साखळी फेरीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दादरा आणि नगर हवेली संघावर ५४-२० असा एक डाव राखून ३४ गुणांनी विजय मिळवला. यात दादरा हवेलीच्या आक्रमकांना महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला बाद करून गुण मिळविता आला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात प्रतिक वाईकरने (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), अनिकेत चेंडवणकर (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) व ऋषिकेश मुर्चावडे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. निहार दुबळे व रविकिरण केंचे यांनी आपल्या आक्रमणात प्रत्येकी ६ गडी बाद केले.
शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूस ३३-२४ असे ९ गुण व ४.५९ मि. राखून नमविले. यात मिलींद चवरेकरने आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी टिपले. शुभम थोरात (२.३० मि. संरक्षण व २ गुण) व प्रतिक वाईकर (१.२०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. तामिळनाडूकडून व्ही. शुभ्रमणी (१ मि. संरक्षण व ६ गुण) याची एकाकी लढत अपुरी पडली.
महाराष्ट्र महिला संघाची विजयी मालिका
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने जम्मू-काश्मीरचा ५३-१० असा एक डाव राखून ४३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जम्मू काश्मीरला खेळाडू बाद करून एकही गुण मिळवू दिला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात सुहानी धोत्रे हिने (२.३० मि. संरक्षण व ६ गुण), संपदा मोरे (२.५० मि. संरक्षण व ३ गुण) मनीष पेडेर (१.४० मि. संरक्षण व ६ गुण) व पायल मोरे (१.४० मि. नाबाद संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबवर ३२-११ असा २१ गुणांनी पराभव केला. प्रियांका इंगळे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), संध्या सुरवसे (३.१५ मि. संरक्षण व ४ गुण) व रेश्मा राठोड (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू खेळी केली. पंजाबकडून राणी (१.३५ मि. संरक्षण ) व नीता देवी (४ गुण) यांची लढत अपुरी ठरली. महिलांच्या अन्य एका सामन्यात विदर्भ संघाने मध्य भारतवर ३७-२० असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
इतर निकाल :
पुरुष गट : महाराष्ट्र पोलिस वि. मणिपूर ३५-२३, पश्चिम बंगाल वि. अखिल भारतीय पोलिस ३०-१८, आंध्र वि. मेघालय ४५-८, केरळ वि. कर्नाटका पोलिस ४५-१२, दिल्ली वि. मध्य भारत २८-१९
महिला गट : पंजाब वि. तेलंगणा २२-१४, केरळ वि. महाराष्ट्र पोलिस २६-९.
असे होणार उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने :
पुरुष : महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र पोलिस, कोल्हापूर विरुद्ध दिल्ली, विदर्भ विरुद्ध केरळ
महिला : महाराष्ट्र विरुद्ध केरळ, कोल्हापूर विरुद्ध राजस्थान, विदर्भ विरुद्ध दिल्ली.