आरोग्य

मुंबई उपनगरामध्ये १६ हजार ३४३ कुपोषित बालके

मुंबई :

मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात तपासात कुपोषित बालके आढळणे, ही बाब चिंताजनक असून यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील १० दिवसात अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आल्याने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अँपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी स्तरावर वजन आणि उंची नोंदीत पोषण ट्रॅकर ॲपवर अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद झाली.

पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद

नोंद झालेल्या अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामधून १,१५९ बालके तीव्र तर ३,०९६ मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले. तर माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये अतितीव्र कुपोषित ४५० आणि मध्यम तीव्र कुपोषित ४०७ बालके आढळली. या संख्येचे अधिकृत प्रमाणिकरण करण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू असून तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *