
मुंबई :
पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या या भयावह कृत्याचा निषेध करत मुंबईतील लीलावती रुग्णालयाने या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना लीलावती रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहे.
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत प्रत्येकालाच खूप मोठा धक्का बसला आहे. दहशतवादाच्या संकटाविरोधात भारतीय सैन्य व भारत सरकार नेहमीच लढा देत आले आहे. मात्र यावेळी या लढ्यामध्ये जखमी झालेल्या देशातील नागरिकांना मदत करण्यासाठी लीलावती रुग्णालयाकडून हे स्तूत्य पाऊल उचलण्यात आले आहे.
लीलावती हॉस्पिटल फॉर लाईफ फॉर लाइफचे संचालक व स्थायी विश्वस्त चारुबेन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या हल्ल्यातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय मदत पुरवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. राष्ट्रावर आलेल्या संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावत पीडीतांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करण्यात येणार असल्याचे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे स्थायी विश्वस्त राजेश मेहता यांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे. त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा यासाठी आवाहन करताना या जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लीलावती रुग्णालयाकडून स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या संकटकाळात लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी सर्व पिडीतांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही स्थायी विश्वस्त राजेश मेहता यांनी केले आहे.
मुंबईत प्रथमच साकारणार टाऊनहॉल इमारत
स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांना आणि कुटुंबातील सदस्य गमावलेल्या व्यक्तींना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून ८४२२८९१०३२ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.