
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. ज्याद्वारे २१ एप्रिल २०२५ पासून, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत घरगुती आणि विशेष काळजी योग्य कचऱ्यासाठी स्वतंत्र संकलन सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत दररोज ७,००० ते ७,५०० मेट्रिक टन कचरा तयार होतो, ज्यामध्ये घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचऱ्याची संख्या सुद्धा मोठी आहे. वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टँपॉन्स, वापरलेले कापूस, बँडेज, औषधे, सिरिंजेस, रेजर ब्लेड्स, आणि ब्युटी पार्लरमध्ये वापरले जाणारे वॅक्सिंग स्ट्रिप्स, PPE या प्रकारांचा यात समावेश होतो. हा कचरा अनेकदा इतर घरगुती कचऱ्यासोबतच टाकला जातो, ज्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. याशिवाय, या प्रकारच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानीदेखील होते. या कचऱ्याचे वर्गीकरण व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘पिवळी पिशवी’ वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विशेष काळजी योग्य कचरा सुरक्षितपणे वेगळा संकलित केला गेला आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला. या उपक्रमाचा उद्देश केवळ व्यवस्थापन नाही, तर जनजागृती करून नागरिकांना स्वच्छतेच्या प्रक्रियेत सामील करणे हा होता.
हेही वाचा : शालेय बस चालकांची होणार दर आठवड्याला मद्यपान चाचणी
या उपक्रमात सहभाग वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्युआर कोडच्या (QR कोड) माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. निवासी सोसायट्या, वसतिगृहे, ब्युटी पार्लर आणि शैक्षणिक संस्था यांनी QR कोड स्कॅन करून छोटा फॉर्म भरून नोंदणी केली. नोंदणीकृत संस्थांना विशेष सॅनिटरी कचरा संकलन सेवा पुरविण्यात आली. ही संकल्पना म्हणजे केवळ कचऱ्याचं व्यवस्थापन नव्हे, तर एक सामाजिक चळवळ ठरली. स्वच्छतेचा विचार केवळ घरापुरता न ठेवता, आपले शहर, आपले कर्मचारी आणि आपले आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार त्यात सामावला. सॅनिटरी वेस्ट हा विषय जितका संवेदनशील, तितकाच महत्त्वाचा आहे, आणि त्याचं योग्य व्यवस्थापन हे आपले वैयक्तिक कर्तव्य सुद्धा आहे. स्वच्छ मुंबईसाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा वेगळा करूया. पिवळ्या पिशवीसह सन्मान, स्वच्छता आणि सुरक्षिततेचं भान ठेवूया.