
मुंबई :
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आलेल्या निर्णयानतंर आता सीईटी सेलकडून राज्यातील बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणखी एक सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीची नोंदणी सुरु केली असून येत्या २० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाही एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असून, २९ व ३० एप्रिल रोजी झालेल्या सीईटी परीक्षेसाठी ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती लावली. पहिल्याच परीक्षेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने पर्यायी उपाययोजना आवश्यक होती. परंतु, आता पुन्हा ऐन प्रवेशाच्या धामधुमीत आणखी एक सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा आधीच्या परीक्षेप्रमाणेच ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार असून त्यासाठी नोंदणी प्रक्रिया १२ जूनपासून सुरू झाली आहे आणि ती २० जून २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिलमध्ये झालेली परीक्षा दिली होती तेही या अतिरिक्त परीक्षेस बसू शकणार आहेत मात्र त्यांच्यासाठी दोन्ही परीक्षांमधून त्यांची ज्या परीक्षेत जास्त गुणप्राप्ती असेल ती गुणपत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचे मार्क्स ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करावे लागणार आहे. नोंदणीनंतर अतिरिक्त सीईटीची अंतिम परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी mahacet.org या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत माहिती तपासावी, असे आवाहन सीईटी कक्षाद्वारे करण्यात आली आहे.ही सीईटी केवळ बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमासाठीच असणार आहे. ही सीईटी केवळ बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमासाठीच असणार आहे. ही संधी केवळ वरील चार अभ्यासक्रमांकरिता उपलब्ध आहे. परीक्षा आधीच्या नमुन्यानुसारच होणार आहे. अतिरिक्त सीईटीची पद्धत, अभ्यासक्रम आधीच्या परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. तसेच गुणांकन पद्धत सुद्धा पर्सेंटाईल पद्धतीने दिले जाणार असल्याचेही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.