
मुंबई :
एमएचटी सीईटी अभ्यासक्रमाच्या भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) गटाचा निकाल रविवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांमधून २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले तर मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहे. राज्याबाहेरील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यामध्ये नवी दिल्ली, जयपूर आणि कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
सीईटी कक्षाकडून एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) या गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिलदरम्यान घेण्यात आली होती. तसेच २७ एप्रिल रोजी अखेरच्या सत्रात झालेल्या गोंधळामुळे ५ मे रोजी पुन्हा अतिरिक्त परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा राज्यातील २०७ केंद्रांवर तर परराज्यातील १७ केंद्रांवर झाली होती. पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाचा निकाल रविवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात आला. पीसीएम गटामध्ये २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले. तर मुंबई व ठाण्यातून प्रत्येकी तीन विद्यार्थी, सांगली व नांदेडमधील प्रत्येकी दोन विद्यार्थी आणि यवतमाळ, कोल्हापूर, भंडारा आणि गोंदियामधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.
एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी मोठ्या संख्येने सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट देतात. त्यामुळे संकेतस्थळ कोसळण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी यंदा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने रविवारी मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. त्यामुळे सोमवारी दिवसभर विद्यार्थ्यांना सुरळीत निकाल पाहणे शक्य झाल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. दरम्यान, भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी गट ) गटाचा निकाल हा १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्री निकाल पाहण्याला पसंती दिली. रात्री १२ वाजून १५ मिनिटांपासून पहाटे ५ वाजपेर्यंत जवळपास १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी निकाल स्वत:च्या लॉगिनमध्ये जाऊन पाहिला. त्यामुळे सोमवारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर कोणताही ताण आला नसल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.