
मुंबई :
स्वातंत्र्यदिनानिमित्त सांताक्रुझ येथील हिंद सेवा परिषद संचलित पब्लिक लॉ कॉलेजमध्ये सकाळी ध्वजारोहण समारंभ दिमाखात पार पडला. यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध महत्वाच्या ठिकाणी “महिला हिंसाचार” या गंभीर सामाजिक समस्येवर आधारित पथनाट्य सादर करून प्रभावी जनजागृती केली.
हे पथनाट्य सांताक्रूझ (पूर्व) रेल्वे स्थानक परिसरात सादर करण्यात आले. स्थानकावरील प्रवासी, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दाद दिली. विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद, घोषवाक्ये आणि प्रतीकात्मक दृश्यांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा अशा प्रश्नांवर प्रकाश टाकत त्याविरोधात जागरूकता निर्माण केली. तसेच इच्छुकांना याबाबत मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्याची संधीही उपलब्ध करून दिले.
हेही वाचा : शहीद पोलीस शिपाई सागर राऊत यांच्या घरी मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सांत्वनपर भेट
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉलेजच्या प्राचार्या जयश्री येंडे, प्राध्यापक निखिल शुक्ला व भावना दुबे यांच्यासह विद्यार्थी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी अशा जनजागृती मोहिमा अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.