मुंबई :
मुंबईतील जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालय हे जे.जे.रुग्णालयाशी संलग्न आहेत. मात्र राज्य सरकारने जी.टी. रुग्णालयाचे १०० विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकाची पूर्तता करण्यासाठी जी.टी. रुग्णालयबरोबरच कामा रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास सलंग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकानुसार विद्यार्थी क्षमता व रुग्णखाटांचे गुणोत्तर राखणे जी.टी. रुग्णालयाला शक्य नाही. ही बाब लक्षात घेता जी.टी. रुग्णालयाला लागूनच असलेले कामा रुग्णालय हे जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने जी.टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच नियुक्ती केली आहे. तसेच महाविद्यालयासाठी आवश्यक असणारे सर्व विषयांचे विभाग, तासिका कक्ष, खाटांची संख्या, प्रयोगशाळा आणि तत्सम गोष्टींची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जी.टी. रुग्णालयातील ५२१ खाटा आणि कामा रुग्णालयातील ५०५ अशा एकूण १०२६ इतकी होणार आहे.
विभागनिहाय खाटांची संख्या
जी.टी. रुग्णालयातील वैंद्यक औषधशास्त्र विभागाच्या ११६ खाटा, लहान मुले विभाग ६० खाटा, त्वचारोग विभाग २२ खाटा, मानसोपचार विभाग ३०, शस्त्रक्रिया विभाग ११७, अस्थिव्यंग विभाग ४८, नेत्रविभाग ३०, कान-नाक-घसा विभाग २८ खाटा, अतिदक्षता विभाग २० खाटा, क्षयरोग विभाग ५० खाटा आहेत. तर कामा रुग्णालयामध्ये आयपीएनसी कक्ष ६९ खाटा, स्त्रीरोग शस्त्रक्रिया विभाग ६४ खाटा, शस्त्रक्रिया विभाग १९ खाटा, एचडीयू कक्ष १६ खाटा, लहान मुलांचे कक्ष ३४ खाटा, यूपीएनसी कक्ष ३३ खाटा, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग २१ खाटा, प्रसूती कक्ष १२ खाटा, एएनसी कक्ष ६४ खाटा आणि अतिदक्षता विभाग ६ खाटा, नवीन रुग्ण कक्ष ४० खाटा, कर्करोग कक्ष ५२ खाटा, वैद्यकशास्त्र विभाग ४० खाटा, वैद्यकीय गर्भपात कक्ष २०, परिचारिका कक्ष १५ अशा ५०५ खाटा कामा रुग्णालयामध्ये आहेत.