मुंबई :
२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून ओळखला जातो. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांचे बीसीजी लसीकरण करण्याचा निर्णय घेत नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार मुबईतील १२० बस थांबे, रेल्वे डबे आणि शहरातील महत्त्वाच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्षयरोगाचे समूल उच्चाटन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये मुंबईतील क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या सातत्याने कमी व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त अधिक जोरकसपणे जागरुकता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबईत १२० फलकांद्वारे आणि १२० बेस्ट बस थांब्यांवर क्षयरोग जनजागृती माहिती संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे. क्षयरोग विषयक ध्वनी संदेश जिंगल स्वरुपात मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आणि मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीस आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.