मुंबई :
प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी ९ एप्रिल २०२४, चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४६ रोजी गिरगावातील फडके श्रीगणपती मंदिरापासून ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ अर्थात ‘गिरगावचा पाडवा’ मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित यात्रेचे हे २२ वे वर्ष आहे. श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने ‘शिवराज्य हेच रामराज्य’ ही यात्रेची संकल्पना आहे..
यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता गिरगावातील फडके श्रीगणपती मंदिरापासून गुढी पूजनाने होईल. मूर्तिकार गीतेश पवार आणि गौरव पवार यांनी साकारलेल्या २२ फूट उंच रामभक्त हनुमंताच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असेल. पर्यावरण रक्षणाचा विचार करून ही प्रतिकृती यंदाही कागदाचा वापर करून बनवण्यात येणार आहे. मूर्तिकार प्रदीप मादुस्करांनी साकारलेला वैभवसंपन्न गणेश यात्रेच्या अग्रस्थानी असेल. गिरगावातील महिला व युवती गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे पठण करणार आहेत. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचा “भगवान रामलल्लाचं दर्शन देणारा तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचं पुण्यस्मरण करणारा’ शिवराज्य हेच रामराज्य या संकल्पनेवरील चित्ररथ यात्रेचं आकर्षण असेल. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांचा शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा भव्य देखावा आणि प्रसिद्ध कलादिग्दर्शक तुषार कोळी यांचा छत्रपती शिवरायांवरील जिवंत देखावा यात्रेची शोभा वाढवणार आहेत. पारंपरिक वेशातील दुचाकीस्वार युवतींचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक, गिरगांव कलामंच तर्फे नयनरम्य संस्कारभारती रांगोळ्या तसेच रंगशारदा तर्फे यात्रा मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, यात्रेच्या शेवटी यात्रेदरम्यानचा कचरा स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा स्वच्छता पथक ही प्रतिवर्षाप्रमाणे यात्रेची वैशिष्ट्ये असणार आहेत.
कापरेश्वरवाडी मंडळातर्फे शिवाजी महाराजांनी करवून घेतलेला नेतोजी पालकर यांचा हिंदू धर्म प्रवेश, रावणाच्या दरबारात स्वतःच्या शेपटीवर आसनस्थ हनुमान, शबरी माता – श्रीराम भेट असा देखावा, शेणवीवाडी मंडळातर्फे शिवरायांची स्वराज्य शपथ यावरील लहान मुलांचा सहभाग असलेला देखावा, मंदार आर्टस्-चिराबाजार यांचा शिवरायांच्या स्वप्नातील अयोध्या – मथुरा – काशी मंदिर मुक्ती संबंधित देखावा, सह्याद्री प्रतिष्ठान यांचा दुर्ग संवर्धनावरील चित्ररथ, स्वामी समर्थ भक्त परिवार यांचा पालखी सोहळा तसेच गिरगावातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळं यांचा सहभाग नववर्ष स्वागत यात्रेत असणार आहे. मुंबईतील पहिले पथक गिरगांव ध्वजपथक नाविन्यपूर्ण अविष्कारासहित, गिरगावचा आवाज म्हणून ओळखले जाणारे गजर ढोल ताशा पथक, मुबईतील नावाजलेले मोरया पथक व विघ्नेश्वर पथक ही यात्रेत सहभागी होणार आहेत. तरुण तरुणींची तसेच लहान मुलांची प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, श्री समर्थ व्यायाम मंदिर यांच्या तर्फे मल्लखांब व रोप मल्लखांब यांची प्रात्यक्षिके,योग प्रात्यक्षिके , तसेच १००% मतदान होण्यासाठी जागृती करणारा चित्ररथ यात्रेत सहभागी होणार आहे. फ्लॅश मॉब अर्थात नृत्यार्पणाचा नावीन्यपूर्ण अविष्कार यात्रेत पाहायला मिळणार आहे. लोककलेच्या समृद्ध परंपरेचे सादरीकरणही यात्रेत होणार आहे.
त्याबरोबरीनेच पपनसवाडी मंडळाची पर्यावरणस्नेही १६ फुटी रामावतारातील गणेश मूर्ती, नितेश मिस्त्री यांनी साकारलेला १ इंचाचा गणपती, जीएसबी गणपती मंडळ, जीवन विद्या मिशन, ब्रह्मकुमारी, सारथी फाउंडेशन, वंदे मातरम प्रतिष्ठान, कळझोंडी ग्रामस्थ मंडळ, कोळीवाडी मंडळ, वेतोशीची दिवंगत महादेव व्यायामशाळा, राजे प्रतिष्ठान, शिवराम युवा प्रतिष्ठान, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा, हिंदू जनजागृती समिती इत्यादी मंडळ-संस्थांचा सहभाग यावर्षी यात्रेत असणार आहे, अशी माहिती स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान प्रचार प्रसिद्धी प्रमुख साईश बानोडकर यांनी सांगितले.
गेली ५ वर्ष वाचकांच्या पसंतीस उतरलेला ‘चैत्र स्वागत’ नावाचा नववर्ष स्वागत विशेषांक यावर्षी सुद्धा प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केला जाणार आहे. या अंकात मान्यवर लेखकांचे वैचारिक लेख, ललित लेख, कथा , कविता व छायाचित्र अशा प्रकारचे दर्जेदार साहित्य असेल. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावास्येला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने गिरगांवातील विविध चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे. यात्रेचा समारोप शामलदास गांधी मार्ग येथे श्री सिद्धिविनायक दर्शन सोहळा व महाआरतीने होईल. संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशात या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अन्वय पिटकर, कार्याध्यक्ष श्रीधर आगरकर, सचिव आशुतोष वेदक आणि यात्राप्रमुख स्वप्निल सातघर यांनी केले आहे.