मुंबई :
उन्हाळ्यातील रक्त तुटवडा टाळण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यापर्यंत पुरेसा रक्तसाठा रक्तपेढ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र एप्रिल व मे मध्ये रक्ताची ही मुबलकता कायम राहावी यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडू राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा असता. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यांमध्ये महाविद्यालय व शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने बरेचसे रक्तदातेही बाहेरगावी जातात. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण घटते. परिणामी दरवर्षी एप्रिल ते मे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असला तरी राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यांमध्ये रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात झाल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, धार्मिक संस्थांना संपर्क करुन स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिल्या आहेत.
रेल्वे स्थानके व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये करणार संकलन
शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायटीमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर देखील भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
निवडणुकांमुळे राजकीय पक्षांच्या शिबिरांवर मर्यादा
दरवर्षी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. अनेक सामाजिक संस्था या राजकीय पक्षांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. मात्र यंदा असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांच्या रक्तदान शिबिरांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.