मुंबई :
हिवताप प्रसार साखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज आहे. तसेच हिवताप नियंत्रणाकरिता उपचार कालावधी कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर संशोधन होत आहे. त्यामुळे उपचार कालावधी कमी करण्यासाठी भारतातही त्याच उद्देशाने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच वैद्यकीय चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च बेंगळुरूचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास बी. एम. यांनी मांडले.
जागतिक हिवताप दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेमार्फत नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, उपचार, मार्गदर्शन तसेच हिवताप निर्मूलन या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादाला संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये तथा नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जयंती शास्त्री, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास बी. एम., केईएम रुग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. कविता जोशी, कीटक नियंत्रण अधिकारी चेतन चौबळ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष डॉ. लाड उपस्थित होते.
‘हिवताप निर्मूलन: हिवतापाविरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा हिवतापाला हरविण्यासाठी’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. त्यामुळे मुंबईला हिवताप मुक्त करण्याच्या वचनबद्धतेबद्दल समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ, असे मत नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी मांडले. हिवतापाच्या रुग्णांनी वेळीच उपचार तसेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. खासगी डॉक्टरांनी हिवतापाचा रुग्ण आढळल्यास संबंधित विभागीय आरोग्य अधिकारी यांना संपूर्ण माहितीसह त्वरित कळविणे गरजेचे आहे. रुणांनी हिवतापाचे उपचार अर्धवट सोडू नये. घराच्या आसपास पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहन डॉ. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले. केईएम रुग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. कविता जोशी यांनी हिवतापाच्या निमित्ताने वैद्यकीय पैलू, अभ्यास प्रकरण आणि शासकीय व राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांसह विविध उपचारांवर चर्चा केली. तसेच मूलगामी उपचारांची गरज आणि प्रयोगशाळेतील निदान बळकट करण्यावर भर दिला. कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी मुंबईतील डासांच्या उत्पत्ती नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी आणि समुदाय जागरूकता यावर लक्ष केंद्रित केले.