मुंबई :
गर्भधारणेचे नऊ महिने सुरळीत पूर्ण होत असताना अचानक गर्भाशय फाटल्याने बाळ बाहेर येऊन त्याचा मृत्यू झाला. गर्भाशय फाटल्याने महिलेच्या जीवाला ही धोका निर्माण झाला होता. त्यातच तब्बल ४ तास ४० मिनिटे प्रवास करून टिटवाळ्याहून या महिलेला कामा रुग्णालयात आणेपर्यंत तिची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करत महिलेला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत तिचे प्राण वाचविले.
उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील ३२ वर्षीय महिलेची सात वर्षांपूर्वी सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली होती. त्यानंतर आता ती पुन्हा गर्भवती राहिली होती. प्रसूतीचे नऊ महिने पूर्ण हाेत आले असताना एप्रिलमध्ये ती पतीसोबत टिटवाळा येथे राहण्यास आली. टिटवाळा पूर्वेकडील नीरवा हेल्थ केअरमध्ये त्यांनी उपचार सुरू केले. ९ मे २०२४ रोजी महिलेच्या केलेल्या सोनोग्राफीमध्ये नऊ महिन्यांचा निरोगी गर्भ दिसून आला. त्यानंतर २१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला नीरवा हेल्थ केअरमध्ये नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी करत रात्री ८ वाजता पुन्हा सोनोग्राफी काढली. यामध्ये महिलेचे गर्भाशय फाटले असून, त्यातून बाळ बाहेर आले. तसेच बाळाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. महिलेच्या नातेवाईकांनी तिला कामा रुग्णालयात रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी कामा रुग्णालयात आणले. टिटवाळ्यहून कामा रुग्णालयात पोहचण्यासाठी रुग्णाला तब्बल पावणे पाच तास लागले. त्यामुळे रुग्णाची अवस्था गंभीर झाली होती. रुग्णाची स्थिती लक्षात घेता डाॅक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भातून ३.१ किलोचे बाळ बाहेर काढण्यात आले. महिलेचे गर्भाशय आणि मूत्राशय फाटलेले असल्याने तिला दोन युनिट रक्त चढविण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिला घरी सोडण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
कामा रुग्णालयामध्ये बहुतांश रुग्ण हे भिवंडी, ठाणे, मुंब्रा, मीरा-भाईंदर, दहिसर आणि गोवंडी या भागातून येत असतात. त्यामुळे प्रवासामध्ये बऱ्याचदा रुग्णांची अवस्था अधिकच गंभीर होते. परंतु आमचे डॉक्टर रुग्णांच्या सेवेमध्ये नेहमीच तत्पर असतात.
– डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
गर्भाशय कशामुळे फाटते
- पहिली प्रसूती सिझेरियनद्वारे झाल्यास
- गर्भाशयातून गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यास
- बाळ अडकल्यास
- चौथी किंवा पाचवी प्रसूती असल्यास
- रुग्ण अशक्त असल्यास
- बाळ मोठे असल्यास