मुंबई :
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या निकालाबाबत सीईटी कक्षाकडून वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षकडून पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात येईल, असे तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली. यामध्ये एमएचटी सीईटी (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख १० जून जाहीर करण्यात आली होती. परंतु सीईटी कक्षाने एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल हा १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटी कक्षाकडून तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.