शहर

जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये मराठी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई :

एरवी पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम एखाद्या हॉल मध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमादरम्यान होतात. पण नुकतेच ‘आम्ही अधिकारी झालो’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन जपानच्या जगप्रसिद्ध बुलेट ट्रेनमध्ये झाले. असे या बुलेट ट्रेनमध्ये प्रकाशन होणारे हे बहुधा जगातील पहिलेच पुस्तक असावे. या पुस्तकाचे प्रकाशन, पुस्तकाचे लेखक, संपादक देवेंद्र भुजबळ, एमटीएनएलच्या निवृत्त उप व्यवस्थापक तथा कवयित्री पौर्णिमा शेंडे, नागरिक प्रतिनिधी जसविंदर सिंग, युवा प्रतिनिधी शिवम खन्ना, टूर गाईड लू विन आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या प्रकाशिका अलका भुजबळ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि पुढे कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावित असलेल्या ५१ अधिकाऱ्यांच्या यशस्वी कथा या पुस्तकात आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना नुकतेच हे पुस्तक भेट दिले असता त्यांनी, हे पुस्तक युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे कौतुक केल्याचे सांगून प्रकाशनापूर्वीच पुस्तकाची पहिली आवृत्ती संपल्याचे सांगितले.

नागरिक प्रतिनिधी म्हणून बोलताना गुरविंदर सिंग यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना नागरिकांच्या करातून पगार मिळतो याचे भान ठेवून त्यांनी स्वच्छ, कार्यक्षम, लोकाभिमुख सेवा बजावून सौजण्यपूर्ण वागणूक दिली पाहिजे. युवा प्रतिनिधी म्हणून बोलताना शिवम खन्ना याने सांगितले की, जशा पालकांच्या मुलांकडून अपेक्षा असतात तशाच मुलांच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत? हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. विशेषत: करिअरच्या बाबतीत मुलांची आवड निवड, कल ओळखून त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. आजचा युवक हा २५ वर्षांपूर्वीच्या युवक नसून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेला आहे, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

पौर्णिमा शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, मी एमटीएनएलमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीस लागले. पुढे लग्न होऊन दोन मुलं झाल्यावर सासरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी चांगली केल्याने अधिकारी होऊ शकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अलका भुजबळ यांनी बहारदारपणे केले. तर कार्यक्रमाचे चित्रिकरण राखी देढीया यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व सहप्रवासी यांनी या अभिनव पुस्तक प्रकाशनास भरभरुन प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *