मुंबई :
रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली येथे आयोजित केलेल्या ९ व्या एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने पुण्याच्या सागर वाघमारेचा २३-१४, १८-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक पटकाविला. तर महिलांच्या अंतिम फेरीत आपले पहिले विजेतेपद पटकविताना ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या अनुभवी ऐशा साजिद खानवर तीन सेट पर्यंत रंगलेल्या लढतीत १८-२०, २५-२०, १७-१७ असा निसटता विजय मिळविला. तिने रोख रुपये ८ हजार व चषकाची कमाई केली.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत मुंबईच्या माजी विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबई उपनगरच्या विद्यमान विश्व् विजेत्या संदीप दिवेवर १८-१६, १४-१५ व २१-६ असा विजय मिळविला. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या निलम घोडकेने मुंबईच्याच अंबिका हरिथला २५-९, ०-२५ व १८-८ असे नमविले. विजेत्यांना रोटरी क्लब ऑफ बोरिवलीचे अध्यक्ष रश्मीकांत संघवी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लबच्या महिला सदस्य अशा संघवी, राज्य कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत तसेच एम सी एफ चे चंद्रकांत पटेल, हेमल शाह, सी. ए. रवी रामय्या, जितेंद्र रॉय, महर्षी देसाई आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.