मुंबई :
करोनामध्ये जंबो केंद्रांमधील रुग्णांसाठी खरेदी केलेली व्हेंटिलेटर ही विविध रुग्णालयांना वितरित केली. केईएम रुग्णालयाला पाठवण्यात आलेली व्हेंटिलेटर मागील काही दिवसांपासून अतिदक्षता विभागात धूळ खात पडली आहेत. ही यंत्रे वापरण्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांकडे विचारणा करूनही काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाच्या कक्षामध्ये तसेच अतिदक्षता विभागामध्ये १२ पेक्षा अधिक व्हेंटिलेटर ठेवली आहेत. कक्षामध्ये असलेल्या या व्हेंटिलेटरबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या वापराबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली जाते. व्हेंटिलेटर उपलब्ध असतानाही रुग्णांना माघारी का पाठवण्यात येते. तसेच तिचा वापर करण्याऐजवी ती धूळ खात का ठेवण्यात आली आहे, असा प्रश्नही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र त्यावर डॉक्टरांकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण होत आहे.
करोनामध्ये विविध ठिकाणी उभारलेल्या जंबो सेंटरमध्ये रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आली होती. करोना कालावधी संपल्यानंतर या यंत्रणेसह अन्य साधनसामुग्री ही विविध रुग्णालयांमध्ये वाटप करण्यात आली. त्याप्रमाणे केईएम रुग्णालयालाही मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर मिळाली. ही व्हेंटिलेटर अद्ययावत नसून प्राथमिक स्वरुपाची आहेत. त्यामुळे काही दिवसांच्या वापरानंतर ही व्हेंटिलेटर बंद पडली आहेत. या व्हेंटिलेटरची दुरुस्ती करायची तर त्यासाठी लागणारा खर्च हा प्रचंड असल्याने ती दुरुस्त करण्यात आली नाहीत. करोना केंद्रातून आलेल्या १२ व्हेंटिलेटरपैकी ९ व्हेंटिलेटर बंद असून तीन कार्यरत आहेत. ही व्हेंटिलेटर कमी अत्यावस्थ असलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येतात. मात्र बंद असलेल्या ९ व्हेंटिलेटरची दुरस्ती करून ती पुन्हा वापरण्याजोगी नसल्याची माहिती केईएम रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
करोना केंद्रातून आलेले व्हेंटिलेटर नादुरूस्त आहेत. ती सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठवण्यासाठी मंजूरी न मिळाल्याने अतिदक्षता विभागामध्ये ठेवली आहेत. तसेच संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून ही यंत्रे दुरुस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. संगिता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय