मुंबई :
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार १००% अनुदान मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आंदोलक ढगफुटीसदृश्य पावसातही आझाद मैदानावर बसून राहीले.पडत्या पावसात महिला शिक्षिका ही खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या. हे शासन आणखीन किती दिवस राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची अवहेलना करणार आहे, हा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना पडलेला आहे. जोपर्यंत शिंदे-पवार-फडणवीस सरकार राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, आम्हाला आता आश्वासन नको ठोस कार्यवाही हवी आहे, या पावित्र्यात शिक्षक आहेत. असे कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे सर म्हणाले.
यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, पुंडलिक रहाटे, राजेंद्र मोरे, बिंदगे,सावंता माळी,पानसरे, संदिप कांबळे, धनाजी साळुंखे, गुलाब पाल, शिल्पा सी, रोहीणी मस्के, गणेश झगडे, निलेश पवार, सुजाता परब, राठोड मॅडम यांसह हजारो अंशतः अनुदानित बांधव यावेळी आझाद मैदानावर उपोषणस्थळी बसून आहेत.