नवी मुंबई :
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या सुपर स्पेशालिटी पीडियाट्रिक कार्डिओलॉजी टीमच्या कौशल्यांमुळे, मॉरिशसहून आलेली दोन प्रीमॅच्युअर नवजात बाळ आपल्या आई बाबाच्या कुशीत हसत खेळत आपापल्या घरी परतली आहेत. ही दोन्ही बाळे नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मली होती आणि त्यांच्यामध्ये दुर्लभ व जीवघेणा, जटिल हृदय रोग जन्मापासूनच आढळून आला होता. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये या नवजात बाळांवर पीडियाट्रिक कार्डिओलॉजी सिनियर कन्सल्टन्ट डॉ भूषण चव्हाण यांनी मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. बाळाच्या हृदयामध्ये जन्मापासूनच असा काही विकार असेल ज्यामुळे हृदयाची संरचना आणि कार्य यावर परिणाम होत असेल तर त्याला जन्मजात हृदय रोग म्हणतात. त्यामुळे नवजात बाळांमध्ये गंभीर, जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास १% मुलांना जन्मजात हृदय रोग असतो, जगभरातील बाळांमध्ये आढळून येणारा हा सर्वात जास्त सामान्य जन्मजात दोष आहे. एकट्या भारतात दरवर्षी २ लाखांपेक्षा जास्त बाळांना जन्मजात हृदय रोग असतो, त्यापैकी एक पंचमांश बाळांमध्ये हा दोष खूपच गंभीर असतो, त्यामुळे जन्मानंतर पहिल्याच वर्षभरात त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक असते.
मॉरिशसहुन आलेल्या या दोन नवजात बाळांपैकी एक बाळ ३४ आठवडयांनी जन्मले होते आणि त्यावेळी त्याचे वजन फक्त १.५ किलो होते. बाळाला पल्मनरी अट्रेसियासोबत टेट्रालॉजी ऑफ फॉलोट झाले होते. या जटिल परिस्थितीमध्ये फुफ्फुसांपर्यंत जाणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये गंभीर अडथळे येतात, त्यामुळे बाळ निळे पडू लागते. दुसरे बाळ देखील नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मले होते आणि त्यावेळी त्याचे वजन फक्त २ किलो होते. या बाळामध्ये हृदयाशी संबंधित अनेक विसंगती होत्या. दुसऱ्या बाळाच्या केसमध्ये एक वेगळेच आव्हान होते. त्याला अनेक हृदय दोष होते, शिवाय हृदय छातीमध्ये उजव्या बाजूला होते. मुळातच नाजूक असलेली प्रक्रिया या आव्हानांमुळे अजूनच कठीण बनली होती. रिअल-टाइम मार्गदर्शनासाठी प्रगत इमेजिंग तंत्राचा वापर करत, डॉ चव्हाण यांनी हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी रक्तवाहिन्यांमार्फत एक कॅथेटर नेव्हिगेट केला आणि हृदयाच्या आत योग्य रक्तप्रवाहासाठी पीडीएच्या आत (पेटंट डक्टस आर्टेरियोसस) दोन स्टेन्ट लावले.
डॉ. भूषण चव्हाण, सिनियर कन्सल्टन्ट-पीडियाट्रिक कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”ही बाळे प्रीमॅच्युअर होती आणि त्यांची स्थिती खूपच गुंतागुंतीची झाली होती, त्यामुळे त्यांच्या केसेसमध्ये अनेक आव्हाने होती. दोन्ही केसेसमध्ये हृदय दोषाचे असे कॉम्बिनेशन होते जे खूपच दुर्लभ आहे. त्यामुळे खूप बारकाईने नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आमच्या टीमचा मला खूप अभिमान आहे, ज्यांनी या केसेस वर काम केले. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा असल्याने आम्ही या नाजूक प्रक्रिया यशस्वीपणे करू शकलो.”
अरुणेश पुनेथा, पश्चिम क्षेत्र-रिजनल सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,” अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही रुग्णाचे वय किंवा केसमधील गुंतागुंत यांची पर्वा न करता सर्वोच्च मानक देखभाल प्रदान करण्यासाठी बांधील आहोत. नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या या बाळांनी आमच्याकडील विशेष उपचार आणि देखभाल मिळवण्यासाठी हजारो मैलांचे अंतर पार केले, त्यांच्या केसेसमध्ये मिळालेले यश डॉ. चव्हाण आणि आमच्या संपूर्ण पीडियाट्रिक कार्डियाक टीमची कौशल्ये, व समर्पण दर्शवते. आम्हाला अभिमान आहे की, जन्मजात हृदय रोगामुळे उत्पन्न होणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करत असलेल्या कुटुंबांना आशा आणि उपचार प्रदान करत आहोत. जागतिक स्तराच्या आरोग्य सेवा प्रत्येकाला उपलब्ध करुन देण्याची आमची बांधिलकी या केसेसमध्ये मिळालेल्या यशाने दर्शवली आहे.”