मुंबई :
परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मधील डॉक्टरांना एका १० वर्षीय मुलीच्या पोटातून ५० सेमी लांबीचा केसांचा गुंता काढण्यात यश आले आहे. या मुलीवर गॅस्ट्रोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम नावाचा दुर्मिळ विकार झाल्याचे आढळून आले. ही स्थिती पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. १० पैकी सुमारे ८ प्रकरणांमध्ये ही समस्या लहान मुले, किशोरवयीन मुली आणि ३० वर्षांखालील तरुणींमध्ये दिसून येते. पालकांना अशा विकारांपासून आपल्या पाल्याला सुरक्षित करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
वसई येथे राहणाऱ्या १० वर्षीय शाळकरी मुलीला १५-२० दिवसांपासून पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्या होत होत्या. तिच्या आई-वडीलांनी तिला जवळच्या परिसरातील काही डॉक्टरांना सल्ला मसलत केली, परंतु निदान होऊ शकले नाही. मुलीच्या पालकांनी तिला बाई जेरबाई वाडीया हाँस्पिटल फाँर चिल्ड्रेन मधील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आणले. मुलीला बद्धकोष्ठता, कुपोषण, वजन कमी होणे आणि ४-५ दिवसांपासून ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची लक्षणे आढळून आली. वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात केसांचा गुंता दिसून आला. तिसा ट्रायकोफॅगिया(केस खाणे), ट्रायकोटिलोमॅनिया (केस खेचणे) याचे निदान झाले.
केस खाल्ल्यामुळे मुलीला रॅपन्झेल सिंड्रोम झाला होता. ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये केसांचा मोठा गुंता पोटात अडकतो आणि तो लहान आतड्यात पसरतो. हे नाव रॅपन्झेलच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, एक परीकथा पात्र जी तिच्या लांब केसांसाठी ओळखली जात होती. रॅपन्झेल सिंड्रोम प्रामुख्याने मानसिक विकार असलेल्या तरुण महिलांमध्ये होतो. शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मुलीच्या आईने सांगितले की, आमच्या मुलीला दुर्मिळ रॅपन्झेल सिंड्रोम असल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. मात्र जेरबाई वाडीया हाँस्पिटल फाँर चिल्ड्रेन येथील डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने आमच्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले.
वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला सांगातात की, ट्रायकोबेझोअर नावाचा हा एक दुर्मिळ आजार असतो. मानसिक स्थिती अस्थिर असली की व्यक्ती केस ओढण्यावर आणि खाण्यावर लक्ष केंद्रीत करते. वाडिया हॉस्पिटलच्या टीमने या रुग्णावर प्रभावी उपचार करत त्याकडे केवळ मानसिक विकार म्हणून न पाहता, तिच्या शारीरीक आरोग्याचीही विशेष खबरदारी घेण्यात आली. रुग्णालयातील हा सर्वसमावेशक दृष्टीकोन मुलांचे भावनिक तसेच शारीरीक आरोग्य मजबूत करण्यावर भर देते.