आरोग्य

जागतिक हृदय दिन : नियमित हृदय तपासणी, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब पातळीकडे तरुणांचे दुर्लक्ष

मुंबई :

जागतिक हृदय दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने एक ऑनलाइन सर्वेक्षण केले ज्यामध्ये नियमित तपासणी टाळून आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती समोर आली. सर्वेक्षणात असे आढळून आले की अनेक व्यक्ती त्यांचा रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी, शारीरिक सक्रियता आणि पाण्याचे पुरेसे सेवन करण्यात अपयशी ठरतात. तरुणांमध्ये अचानक येणारा हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंतीच्या वाढत्या घटनांविषयी माहिती देताना तज्ज्ञ सांगतात की, तिशीनंतर ह्रदयाच्या तपासणीसह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब पातळीकडे दुर्लक्ष केले जाते.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड द्वारे आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात 20-75 वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया अशा 547 व्यक्तींचा समावेश होता. 152 लोकांपैकी 100 जणांनी क्वचितच त्यांच्या रक्तदाबाचे तपासणी केलेली आहे, तर 52 जणांनी नियमितपणे ते तपासणी केल्याचे आढळून आले. 103 पैकी 64 जणांनी कोलेस्टेरॉलची पातळी तपासली नाही तर 39 जणांनी त्यांचा फॅालोअप घेतला नाही. 115 सहभागींपैकी 66 जणांनी आठवड्यातून केवळ एखादा दिवस व्यायाम केला तर 49 व्यक्ती आठवड्यातून तीनदा व्यायाम करत असल्याचे आढळून आले. 177 सहभागींपैकी 90 व्यक्ती पुरेसे पाणी पित नसल्याचे आढळून आले. या व्यक्ती 8 ग्लासपेक्षा कमी पाणी पितात तर 87 व्यक्ती 8 ग्लासपेक्षा जास्त पाणी पितात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल पातळी तपासणे किती गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठी हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते.

उच्चरक्तदाब हा एक सायलेंट किलर आहे आणि यामुळे हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक, किडनी रोग आणि परिधीय रक्तवहिन्यासंबंधी विकार होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमधील उच्च रक्तदाबाच्या ताणामुळे एंडोथेलियममध्ये झीज होते (रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत), रक्तवाहिन्यांना दुखापत, स्टेनोसिस आणि प्लेक तयार होण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब असलेल्या 100 लोकांपैकी 30 लोकांचे निदान झाले आहे आणि औषधे लिहून दिली जात आहेत. केवळ 30% व्यक्ती या औषधांचे सेवन करत असल्याची चिंताजनक बाब या अहवालातून समोर आली आहे. 100 पैकी फक्त 3 व्यक्ती रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरत असल्याची माहिती डॉ अनुप आर ताकसांडे (इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड) यांनी दिली.

डॉ अनुप ताकसांडे पुढे सांगतात की, धमन्यांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलमुळे प्लेक तयार होतो, ज्यामुळे रक्त प्रवाह मर्यादित होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि यासाठी आवश्यक उपाय आणि औषधोपचार करणे गरजेचे आहे. रक्तदाबाचे निरीक्षण करणे, कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनासाठी लिपिड प्रोफाइल चाचण्या करणे आणि वयाच्या तिशीनंतर दरवर्षी हृदय तपासणी करणे आवश्यक आहे. पुरेसे हायड्रेशन राखणे आणि आठवड्यातून पाच दिवस ४५ मिनिटे व्यायाम करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जर उच्च रक्तदाब असलेल्या लोकसंख्येच्या निम्म्या लोकांनी रक्तदाब नियंत्रित केला तर 2040 पर्यंत भारतातील किमान 4.6 दशलक्ष मृत्यू टाळता येतील. देशाच्या लोकसंख्येपैकी 31 टक्के म्हणजे 188.3 दशलक्ष लोक सध्या या स्थितीत जगत आहेत. उच्च रक्तदाब (140/90 mmHg किंवा त्याहून अधिक) हा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हृदयाची क्रिया बंद पडणे, मूत्रपिंडावर दुष्परिणाम होणे आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात आणि ते टाळता येण्याजोगे आहे. केवळ 37 टक्के भारतीयांना उच्च रक्तदाबाचे निदान होते आणि त्यापैकी केवळ 30 टक्के व्यक्ती उपचार घेतात. सध्या, देशातील उच्च रक्तदाब असलेल्यांपैकी केवळ 15 टक्के व्यक्ती या आजार नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येते. देशातील निम्म्याहून अधिक मृत्यू (52 टक्के) हे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या तसेच उच्च रक्तदाबामुळे होतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *