मुंबई :
मुंबईकर नागरिकांना आपल्या घरानजीक वैद्यकीय तपासणी, उपचार व आरोग्य सल्ला देणारी लोकप्रिय अशी आरोग्य सेवा अर्थात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आता अधिक गतीशिल होत दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. पी दक्षिण व एम पूर्व विभागात दुर्गम परिसरांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत दोन फिरत्या तपासणी केंद्रांचे लोकार्पण मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा मुंबईकरांना आणि इतर ठिकाणांहून येणाऱया नागरिकांना देखील आरोग्य सेवा पुरवते. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ च्या माध्यमातून मुंबईतील कानाकोपऱयात महानगरपालिकेची आरोग्य सेवा विस्तारली आहे. त्यासोबतच, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, गोराई गांव यासारख्या तुलनेने दुर्गम भागांतील पाडे आणि वस्तीपर्यंत नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. गरजू नागरिकांना आरोग्याच्या सेवा सहज उपलब्ध होताना विशेषतः विनामूल्य वैद्यकीय तपासणी, उपचार व सल्ला उपलब्ध व्हावेत, यादृष्टिने आपला दवाखाना योजनेतून विस्तार करावा, अशी सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केली होती.
हे निर्देश अंमलात आणून फिरत्या आरोग्य सेवा तपासणी केंद्राच्या माध्यमातून दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. कारण, दुर्गम भागातील वस्तीमध्ये मोकळ्या जागेचा अभाव असल्या कारणाने पोर्टा केबिन बांधून आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मर्यादा येतात. त्यामुळे, फिरत्या आरोग्य तपासणी केंद्राच्या रुपाने तेथे वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे.
मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते, चेंबूर मधील जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल येथे या फिरत्या तपासणी केंद्रांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, मे. अमेरिकेयर्स इंडिया फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दोन फिरत्या केंद्रापैकी एक मोबाईल वाहन पी दक्षिण विभागातील आरे वसाहत विभागासाठी सेवा देईल. तर दुसऱया वाहनाच्या माध्यमातून एम पूर्व विभागात अण्णा भाऊ साठे नगर, लोटस वसाहत, रफी नगर, चिता कॅम्प भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. या फिरत्या आरोग्य तपासणी केंद्राची सेवा देण्याची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी असेल.
मे. अमेरिकेयर्स इंडिया फाऊंडेशन यांच्यामार्फत कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी तत्व अंतर्गत हे दोन्ही फिरते आरोग्य तपासणी केंद्र (मोबाईल वाहन) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत १ वैद्यकीय अधिकारी, १ परिचारिका, १ औषधनिर्माता आणि १ बहुद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत दुर्गम परिसरातील नागरिकांना मोफत तपासणी, मोफत सल्ला, मोफत औषधोपचार याचा लाभ घेता येईल. तसेच आवश्यकतेनुसार नजीकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात संदर्भित केले जाईल, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.