शहर

नरिमन पॉइंट येथील चार बेवारस मुलींचे पुनर्वसन

मुंबई :

नरिमन पॉइंट येथील पदपथावर चार बालके विना पालक हिंडताना आढळून आली. या चार ही मुली असून दोघीजणी मोठ्या आहेत आणि आपल्या दोन जुळ्या लहान बहिणींचा सांभाळ करतात. याची माहिती चाइल्ड लाईनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा कर्मचाऱ्यांना चार बालके आढळून आली. दरम्यान, पालकांचे समुपदेशन करून सर्व बालकांना बालगृहात दाखल करण्यात आले असून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

बालकांना आई – वडील आहेत. आई ही नशा करत असून ती कुठेही जाऊन झोपत असते. वडील हे टॅक्सी चालक आहेत ते देखील नशा करतात. या बालकांना पालकांचे छत्र हे असून नसल्या सारखे आहे. त्यामुळे ही बालके पदपथावर राहून आपले आयुष्य जगत आहेत.

गेल्या १० ते १५ दिवसांपासून मोठी मुलगी शाळेत जात नसून आपल्या लहान बहिणींचा सांभाळ करत आहे. बालकांची आई ही चौपाटीवर फुले विकण्याचे काम करते, असे आईने सांगितले. आई – वडील हे मंत्रालयाजवळील पदपथावर झोपतात आणि बालके ही वडिलांच्या टॅक्सीमध्ये झोपतात, अशी माहिती बालकांच्या वडिलांनी दिली.

बालगृहात मुलींना ठेवण्यास तयार आहात का? असे कर्मचाऱ्यांनी विचारले असता पालकांनी होकार दिला. मुलींना तात्पुरता निवारा म्हणून शेल्टर होममध्ये ठेवण्यासंदर्भात फोनवर संस्थेशी आणि शेल्टर होम यांच्याशी कर्मचाऱ्यांचे बोलणे सुरू होते. १७ ऑक्टोबर रोजी पालकांना बालकांसह बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. परंतु, त्यांनी पुन्हा बालगृहात किंवा शेल्टर होममध्ये मुलांना ठेवण्यास नकार दिला. १८ ऑक्टोबर रोजी पालकांचे समुपदेशन करून बालकांना बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने मुंबई शहर जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष (मुंबई शहर), बाल कल्याण समिती (मुंबई शहर) व चाइल्ड हेल्पलाइन मधील कर्मचारी यांनी ही कारवाई पूर्ण केली.

बालकांचे बालपण हिरावू नका!

महाराष्ट्रासह मुंबईच्या रस्त्यावर, नाक्यावर व चौकट बेवारस लहान मुलं किंवा पालक मुलांचा व्यवस्थित सांभाळ करत नाहीत. अशी लहान मुलं आढळून आल्यास त्वरित महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला याची माहिती द्या. बालकांचे बालपण हिरावू नका. आपण बालकांना त्याचे हक्क व स्वातंत्र्य देऊ. आयोगाच्या चिराग ॲप किंवा mscpcr.org या वेबसाईटवर माहिती देऊ शकता. याशिवाय mscpcr@gmail.com या ईमेल आयडीवर देखील तक्रार नोंदवू शकता. मुंबईतील आयोगाच्या कार्यालयातील ०२२२४९२०८९७ या दूरध्वनी क्रमांकावर आणि चाइल्ड लाईन नंबर १०९८ वर ही माहिती देऊ शकता, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी केले.

१०९८/११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा!

मुंबई शहर जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष (मुंबई शहर) अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन २४ तास कार्य करीत आहेत. रस्त्यावर राहणारी बालके, भीक मागणारे बालके, तसेच बालकामगार असे दिसून आल्यास त्वरित १०९८/११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जेणेकरून अशा बालकांना योग्य सेवा पुरवली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *