मुरबाड :
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढीसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार दिले जातात. तालुक्यातील एका शिक्षकाला राज्य स्तरावरील पुरस्कार दिला मात्र रोख एक लाख रुपये व दोन वेतनवाढी जाहीर करूनही १३ वर्ष झाली तरी अद्याप दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकाने आपल्या सेवानिवृत्तीच्या सन्मान सोहळ्यावर बहिष्कार टाकून पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला परत करण्याचा निर्धार केला आहे.
तालुक्यातील भादाणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डॉ. यादव आवार यांना २०११ मध्ये शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या पुरस्कारासह रोख एक लाख रुपये आणि विशेष दोन वेतनवाढी देण्याचे आदेश असताना २०११ साली मिळालेल्या पुरस्काराची रोख रक्कम आणि वेतनवाढी नोव्हेंबर २०२४ पर्यंत आवार हे सेवानिवृत्त होईपर्यंत मिळाल्या नाहीत. ठाणे जिल्हा परिषदेने ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा ९ डिसेंबर रोजी सन्मान सोहळा आयोजित केला असता, आवार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र आपल्याला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा नामधारी ठरल्याने त्यांनी या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शासन शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच कौशल्य वाढीसाठी जे शिक्षक शाळेत विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवुन आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करते. तालुक्यातील भादाणे जिल्हा परिषद शाळेवर असलेले पदवीधर शिक्षक व ज्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली असे डॉ. यादव भाऊ आवार यांना शासनाने २०११ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना एक लाख रुपये रोख रक्कम व दोन विशेष वेतनवाढी देण्याचे आदेश असताना ठाणे जिल्हा परिषदेने त्यांचे सोबत पुरस्कार घेणाऱ्यांना तो लाभ देण्यात आला. मात्र आवार यांना तब्बल १३ वर्षे राज्यस्तरीय पुरस्काराचा कोणत्याही प्रकारे मोबदला दिला नाही. हा मोबदला मिळण्यासाठी आवार यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे विनंती अर्ज केले. परंतु एकाही अधिकाऱ्याने या शिक्षकाची दखल घेतली नाही. अखेर ते नोव्हेंबर २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. जिल्हा परिषद आता तरी मला माझ्या पुरस्काराचा मोबदला देईल आणि माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम मी मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित करीन अशी अपेक्षा असलेल्या आवार यांनी आठ दिवस प्रशासनाची वाट पाहिली. परंतु संवेदनाहिन प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याने त्यांनी आपला सेवानिवृत्ती कार्यक्रम ८ डिसेंबरला पार पाडला. नऊ डिसेंबरला ठाणे जिल्हा परिषदेने त्यांना आमंत्रण दिले की आपण ठाणे जिल्हा परिषदेत शिक्षक या पदावरून नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले असल्याने आपल्याला जिल्हा परिषदेकडून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी आपली उपस्थिती दाखवावी, असे निमंत्रण दिले असताना आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला असुन त्यासोबत कोणत्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्याने तो पुरस्कार नामधारी ठरल्याने सेवानिवृत्तीनंतर ठाणे जिल्हा परिषदेकडून मिळणारे सन्मानचिन्ह तरी का घ्यावे, यासाठी त्यांनी सन्मान सोहळ्यावर बहिष्कार टाकून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
शासनाने २०१७ मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रोख रक्कम व दोन विशेष वेतनवाढी न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यादव आवार यांना हा मोबदला द्यावा की नाही याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागितले आहे.
– रोहन घुगे.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
.