मुंबई :
मुंबई येथील एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाज कार्य विभागाने समाजकार्य विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले पाच दिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण ह्याच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे यशस्वी झाले.
शिबिरात विविध सत्रांद्वारे तज्ञांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. “सहभागी ग्रामीण मूल्यांकन” प्रात्यक्षिक करून महत्व सांगितले. आदिवासी समाज शाश्वत राहण्यासाठी असणारे सरकारी कायदे समजावून सांगितले. एका सत्रात व्यक्तिमत्व विकास, समाजसेवक कौशल्य आणि मूल्ये यांचे महत्त्व विषद केले. सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव आणि समन्वयक श्रावणी चिपळूणकर यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
शिबिराच्या सांगता समारोप प्रसंगी गावच्या सरपंच लक्ष्मीबाई नाईक, उपसरपंच मंगलसिंह पाटील तसेच पोलिस पाटील हारसिंग पावरा कस्तुरबा गांधी मुलींचे वसतिगृह, अधीक्षका राजवन्ती पवार, शिक्षक निलेश पाडवी, सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन तसेच ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी ग्रामीण अध्ययन शिबिरा दरम्यान आदिवासी जीवन शैली, त्यांचा परंपरा, मान्यता, संस्कृती यांचा अभ्यास केला. तसेच गावातील समस्यांचा ऊहापोह करून शिबिराच्या समारोप प्रसंगी या विद्यार्थिनींनी एक पथनाट्य सादर केले. त्यातून त्यांनी या समस्यांचे उपायदेखील सुचवले. यावेळी गावातील सरपंच व उपसरपंच यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. तसेच गावकऱ्यांनीही या शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थिनींना वेळोवेळी सहकार्य केले.