नवी दिल्ली :
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय पुरुषांनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिला संघाने कालचा अध्याय आज पुढे चालू ठेवत इराणला अक्षरशः लोळवले. भारताच्या पुरुष संघाने पेरूचा ७०-३८ असा ३२ गुणांनी धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले. महिला संघाने दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक १७५-१८ अशा विजयानंतर इराणला ८४ गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले.
पेरूने पहिल्या डावात १६ तर दुसऱ्या डावात २२ गुणांची कमी करत सामन्यात थोडीफार रंगत भरली. मध्यंतराला भारताने ३६-१६ अशी २० गुणांची आघाडी घेत आपले विजयाचे इरादे स्पष्ट केले होते व ३२ गुणांनी विजय मिळवत त्यावर शिक्कामोर्तब केले व उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले.
भारत आणि पेरू संघामध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत सामन्यावर नियंत्रण मिळवले. पेरूने पहिल्या डावात १६ तर दुसऱ्या डावात २२ गुणांची कमी करत सामन्यात थोडीफार रंगत भरली. मध्यंतराला भारताने ३६-१६ अशी २० गुणांची आघाडी घेत आपले विजयाचे इरादे स्पष्ट केले होते. कर्णधार वझीर प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली भारताने आपली आघाडी कायम ठेवत पहिल्या फेरीत ३६ गुणांची कमाई केली. दुसऱ्या टर्नमध्ये आदित्य पोटे, शिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांनी चमकदार खेळ करून भारताचा दबदबा वाढवतच नेला. तिसऱ्या आणि चौथ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपला खेळ उंचावत ७० गुणांची कमाई केली. या सामन्यात अनिकेत पोटेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारतीय महिला संघाने सामन्याची सुरुवात नेहमीच्या आक्रमक शैलीने केली. पहिल्या टर्नमध्ये त्यांनी इराणच्या पहिल्या बॅचला अवघ्या ३३ सेकंदांत बाद केले. अश्विनीने आघाडी घेत संघासाठी सुरुवातीलाच गुण मिळवले, तर मीनूने आपला शानदार फॉर्म कायम राखत अनेक सहज स्पर्शाने गुण मिळवले. पहिल्या टर्नमध्येच भारतीय संघाने ५० गुणांची कमाई केली. सामना पुढेही एकतर्फी राहिला. तिसऱ्या टर्नच्या शेवटी भारताचे ९३ गुण झाले होते व शेवटच्या टर्न मध्ये ७ ड्रीम रन वसूल करत भारताने गुणांची शंभरी गाठली. भारतीय महिलांनी १००-१६ असा मोठा विजय मिळवला. या कामगिरीने त्यांना गटात अव्वल स्थान मिळवून दिले आहे. वझीर निर्मलाच्या डावपेचांच्या कौशल्याने आणि कर्णधार प्रियांका इंगळे, निर्मला भाटी आणि नसरीन यांच्या योगदानामुळे भारताने आणखी एक प्रभावी व मोठा विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने या स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
आम्हाला फक्त जिंकायचे नसून खो-खो मध्ये जगावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचं असल्याचे सांगत भारताची कर्णधार प्रियंका इंगळेने यापुढेही भारत गुणांची उधळण करेल असे जाहीर केले होते. या सामन्यात भारतीय खो-खो खेळाडूंनी इराणच्या खेळाडूंना पळताभुई थोडे केले. काल पत्रकार परिषदेत प्रियांकाला १७५ गुणांबद्दल विचारले होते त्यावर तिने व्यक्त केलेले वाक्य खरे करत याही सामन्यात भारताच्या खेळाडूंनी गुणांची शंभरी गाठली.
केनियाची ऑस्ट्रेलियावर निसटती मात
पुरुष गटातील एका चुरशीच्या सामन्यात केनियाने ऑस्ट्रेलियावर ५८-५४ अशी मात केली. मध्यंतरास ऑस्ट्रेलियाने केनियावर २८-२६ असे निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र केनियाने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. किनियाचा मोसेस अटेन्या (१.२३ मि. संरक्षण व १४ गुण ) याने अष्टपैलू खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा मंगेश जगताप आक्रमक पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने यात १२ गडी टिपले. सकाळी झालेल्या सामन्यात मंगेशने जर्मनी विरुद्धही आक्रमकचा पुरस्कार आणि काल झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला होता.