मुंबई :
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. मात्र पुढील दोन दिवस त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
सैफ अली खान यांच्यावर पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी एका अनोळखी व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर धारदार शस्त्राने सहा वार केले. यातील दोन वार हे खोलवर झाले असून, एक जखम ही मणक्याजवळ होती. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्याने त्याच्या मणक्याला मोठी दुखापत झाली होती. चाकू काढून टाकण्यासाठी आणि मणक्यातील द्रव थांबविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणि मानेच्या उजव्या बाजूला आणखी दोन खोल जखमा होत्या. यावर सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन यांच्या नेतृत्वाखालील शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुडवा यांनी शस्त्रक्रियेचे निरीक्षण केले. सैफ आता पूर्णपणे स्थिर असून धोक्याबाहेर आहे. शुक्रवारी सकाळी त्याला अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षामध्ये हलविण्यात येईल. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत त्याला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती लीलावती रुग्णालयातील मज्जातंतू तज्ज्ञ डॉ नितीन डांगे यांनी दिली.
सैफ अली खान याच्यावर मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. नीरज उत्तमनी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत आहे. सैफला अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, त्याला एक-दोन दिवसांत सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. दुखापती खोलवर असल्या तरी लीलावती रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या तुकडीने योग्य व उत्तम उपचार केले असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नीरज उत्तमनी यांनी दिली.
सैफ अली खान याची प्रकृती सुधारत असून, त्याला लीलावती रुग्णालयाकडून सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याची हमी आम्ही देत असल्याचे लीलावती रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता यांनी सांगितले.