आरोग्य

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय तरुणावर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

नवीन वर्षाची अनोखी भेट - ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण

मुंबई :

एका भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय हृतिक सिंग परिहारला नव्या वर्षात यशस्वी हात प्रत्यारोपणाने आयुष्यातील एक अनमोल भेट मिळाली. डॉ. नीलेश सातभाई(प्लास्टिक, हँड, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांटेशन विभागाचे प्रमुख, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई) आणि त्यांच्या टीमने २०२५ मध्ये हॉस्पिटलचे पहिले हात प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.आजपर्यंत एकूण वेगवेगळ्या अशा २४ हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले असून रूग्णालयातील हे १३ वे यशस्वी हात प्रत्यारोपण ठरले आहे.

२०१६ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी, इंदोर ते मुंबई या रेल्वे प्रवासादरम्यान हृतिक सिंग परिहारच्या आयुष्याला एक दुःखद वळण आले. तो इंदोरहून मुंबईला पर्यटनासाठी जात होता. पुण्यातील चिंचवड स्थानकावर गाडी बदलत असताना, गर्दीत चुकून धक्का लागल्याने तो दोन गाड्यांमध्ये जाऊन पडला. या अपघातामुळे दोन्ही हात खांद्यापासून निखळले. व तेव्हापासून ते आजपर्यंत त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याच्या घरी वयोवृद्ध पालक असून तो एकटा कमावणारा होता. मात्र या अपघातानंतर हृतिकला शारीरिक, भावनिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले.

अपंगत्वामुळे बऱ्याच मर्यादा येऊनही, हृतिकने दृढनिश्चय करत त्याचे शिक्षण पूर्ण केले आणि अभियंता म्हणून नोकरी देखील मिळवली. त्याच्या घरात तो एकमेव कमावती व्यक्ती होती. त्याने लॅपटॉप आणि मोबाइल फोन वापरण्यासह दैनंदिन कामांसाठी पायांचा वापर करण्यात प्रभुत्व मिळवून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटलला भेट दिली जेथे त्याला आशेचा किरण गवसला. प्रख्यात हँड ट्रान्सप्लांट सर्जन डॉ नीलेश सातभाई यांचा सल्ला घेत त्यांचा नवा प्रवास सुरु झाला.

स्वप्न सत्यात उतरले

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आणि योग्य दात्याची वाट पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्यात हॉस्पिटलने गुंतागुंतीची हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. हे प्रकरण आव्हानात्मक होते. इंदोरमधील ६९ वर्षीय दात्याकडून मिळालेला हात हृतिकसाठी योग्य ठरला ३० डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेली ही शस्त्रक्रिया आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच 15 तासांहून अधिक काळ सुरु होती.

डॉ. नीलेश सातभाई(प्लास्टिक, हँड, रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी अँड ट्रान्सप्लांटेशन विभागाचे प्रमुख , ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ, मुंबई) सांगतात की, उच्च पातळीच्या विच्छेदनामुळे ऋतिकचे प्रकरण हे दुर्मिळ आणि आव्हानात्मक होते. संपुर्ण टीमच्या मदतीने आम्ही रुग्णाच्या रक्तवाहिन्या, नसा आणि हाडे अचूकपणे दुरुस्त करू शकलो, हृतिकला या स्तरावर हात प्रत्यारोपण करणे अत्यंत दुर्मिळ असून अशी केवळ काही प्रकरणेच जगभरात केली जातात, ज्यामुळे तो ९ ते १२ महिन्यांमध्ये हाताची कार्ये पुर्ववत करु शकेल अशी अपेक्षा आहे.

ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सने प्रगत शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध आहे, याठिकाणी रुग्णांची काळजी आणि पुनर्प्राप्तीमध्ये नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. हृतिकची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यातून हे सिद्ध होते, दृढनिश्चय आणि वैद्यकीय प्रगतीमुळे अवघड आव्हानांवरही मात करता येते. अशा महत्त्वपूर्ण कामगिरीसह २०२५ ची सुरुवात करण्याचा आम्हाला सन्मान वाटतो अशी प्रतिक्रिया ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परेल, मुंबईचे सीईओ डॉ बिपिन चेवले यांनी व्यक्त केली.

हे ऐतिहासिक प्रत्यारोपण हृतिकसाठी एका नवीन सुरुवात ठरली आहे, या तरुणाचा आत्मविश्वास व दृढनिश्चय नियतीपुढे देखील फिका पडला असून त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या त्याच्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, हात गमावणे हे माझ्यासाठी अत्यंद धक्कादायक होते; त्या क्षणी मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटले. अगदी लहान-सहान गोष्टीसाठी देखील मला इतरांची मदत घ्यावी लागत होती. पण मला हार मानायची नव्हती. मला असे वाटते की आयुष्य जगण्याती दुसरी संधी मला मिळाली आहे. ज्या डॉक्टरांनी आपल्या कौशल्याने आणि समर्पणाने हे शक्य केले त्या डॉक्टरांचे तसेच दात्याचे व त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करण्याची संधी दिली आहे आणि मी सदैव त्यांचा ऋणी राहीन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *