आरोग्य

राज्यातील निवासी डॉक्टरांना आवश्यक सेवा सुविधा द्याव्या – हसन मुश्रीफ 

मुंबई :

राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय होणे महत्वाचे आहे. यासाठी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये त्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव तुषार पवार, शंकर जाधव आदी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, निवासी डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सुरक्षेसाठी रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. निवासी डॉक्टर्सना रुग्ण कक्षाशेजारी साईड रुम, महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याबाबत गृह विभागासोबत समन्वय साधून त्याचा पाठपुरावा करावा. डॉक्टरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा.

निवासी डॉक्टरांसाठी वसतीगृहाची सुविधा करावी. नवीन वसतीगृहे बांधकामांबाबत प्रस्ताव सादर करावेत. काही ठिकाणी वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारती उपलब्ध करून घ्याव्यात. ज्या डॉक्टरांची वसतीगृहात निवासव्यवस्था होत नाही, अशा डॉक्टरांना घरभाडे भत्ता देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. बैठकीत मूलभूत सुविधा मिळणे बाबत तसेच निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत मिळावे. शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भेटीसाठी पासेस प्रणाली लागू करणेबाबत चर्चा झाली. निवासी डॉक्टरांना प्रलंबित महागाई भत्ता देण्यासंदर्भात महाविद्यालय स्तरावरून माहिती घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *