
मुंबई :
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबईने ॲलजील सिंड्रोम या यकृताच्या प्राणघातक अनुवांशिक आजाराचे निदान झालेल्या एका १३ महिन्यांच्या बाळावर जिवंत दाता यकृत प्रत्यारोपणाची गुंतागूंतीची व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. मैलाचा टप्पा ठरणारे हे प्रकरण अत्यंत कमी वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याच्या काही मोजक्या उदाहरणांपैकी एक आहे.
या बाळाला तीन महिन्यांपूर्वी गंभीर स्वरूपाच्या काविळीसाठी तसेच यकृताचे काम योग्य प्रकारे चालत नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अवघ्या सहाव्या महिन्यात त्याला ॲलजील सिंड्रोम (Alagille Syndrome)चे निदान झाले होते, त्यानंतर त्याची तब्येत अधिकाधिक ढासळत गेली व त्याची परिणती क्रॉनिक किडनी डिजिजमध्ये झाली व तग धरणे अशक्य होऊ लागले. आजार हळुहळू अधिकाधिक तीव्र होत आहे हे लक्षात घेऊन व मुलावरील संभाव्य परिणामांचे चिंताजनक स्वरूप पाहता त्याच्यासाठी जिवंत दात्याच्या यकृताच्या प्रत्यारोपणाचे नियोजन करण्यात आले व त्याच्या आईने दाता बनण्यासाठी स्वेच्छेने होकार दिला.
बाळाचे वजन अत्यंत कमी म्हणजे केवळ ५.५ कि.ग्रॅ (५ कि.ग्रॅ. ड्राय वेट) असल्याने आणि शरीराच्या पृष्ठभागाचा लहान आकार असल्याने १२ तास चाललेली शस्त्रक्रिया विशेषत्वाने आव्हानात्मक ठरली. या शस्त्रक्रियेदरम्यान सिर्हॉटिक नेटिव्ह लिव्हर काढून टाकणे व दात्याकडून मिळालेल्या तुलनेने मोठ्या आकाराच्या यकृताचे आरोपण करणे यांसारख्या अत्यंत खडतर आव्हानांना टीम सामोरी गेली. लिव्हर ट्रान्स्प्लान्ट अँड एचपीबी सर्जरी विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. अशोक थोरात म्हणाले, “या शस्त्रक्रियेच्या सर्वात गुंतागूंतीच्या बाजूंपैकी एक म्हणजे दात्याकडून मिळालेल्या यकृताचा ग्राफ्ट आणि लहान मुलाच्या उदराची लहान पोकळी यांचे आकार जुळणारे नव्हते.” त्यांनी पुढे स्पष्ट केले, “आम्हाला रक्तवाहिन्यांच्या रचनेला धक्का लागू नये याची खबरदारी घेत अत्यंत काटेकोरपणे ग्राफ्टचा आकार कमी करावा लागला व अचूकतेसाठी हाय-मॅग्निफिकेशन लेन्सेसचा वापर करून व्हॅस्क्युलर अॅनास्तोमोसिसची अत्यंत नाजूक प्रक्रिया पार पाडावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी कमीत-कमी रक्तस्त्राव होणे व ग्राफ्टचा एकसंधपणा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे होते.”
शस्त्रक्रियेनंतर खास बाल यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणांसाठी राखीव आयसीयूमध्ये, अत्यंत निर्जंतुक वातावरणामध्ये बाळाची काळजी घेतली गेली. पहिल्या तीन दिवसांसाठी त्याला यांत्रिक श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले व त्यानंतर शस्त्रक्रियेनंतरच्या चौथ्या दिवशी ही यंत्रणा काढून टाकण्यात आली. आणखी दोन दिवस आयसीयूमध्ये काटेकोर निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याच्या प्रकृतीत अधिक सुधारणा होईपर्यंत त्याला एका खासगी कक्षात ठेवण्यात आले. क्लिनिकल टीमच्या बहुशाखीय कार्यपद्धतीमुळे बाळाच्या तब्येतीमध्ये सहजतेने सुधारणा होऊ शकली.
हेही वाचा :रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा १९ एप्रिल रोजी दुसरा स्थापना दिन सोहळा
“अत्यंत कमी वजनाच्या बाळाच्या शरीरात एका जिवंत दात्याच्या यकृताचे प्रत्यारोपण करणे ही एक अत्यंत जोखमीची व तांत्रिकदृष्ट्या मोठ्या कुशलतेची गरज असलेली प्रक्रिया आहे.” डॉ. थोरात पुढे म्हणाले. “जगभरामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सर्जिकल टीम्सकडे अशी प्रकरणे यशस्वीपणे हाताळण्याचे कौशल्य आहे.”
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे फॅसिलिटी डिरेक्टर डॉ. झुबिन परेरा टीमच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हणाले, “या शस्त्रक्रियेची यशस्वी फलनिष्पत्ती म्हणजे आमच्या स्पेशलाइज्ड ट्रान्स्प्लान्ट युनिटचे कौशल्य, समर्पितता आणि टीमवर्क यांचे मूर्त उदाहरण आहे. कितीही धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या बालरुग्णांना प्रगत, जीवनदायी देखभाल पुरविण्याप्रती आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. ”